लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (चंद्रपूर): गडचांदूर मार्गावरील कापनगावजवळ बुधवारी (दि. २८) भीषण अपघातात ठार झालेल्या सहा मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण २४ लाख रुपयांची मदत आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च देण्याचे जी. आर. एल. कंपनीने शुक्रवारी (दि. २९) मान्य केले. आमदार देवराव भोंगळे यांनी मदतीबाबत तहसीलदारांच्या कक्षात मृतकांचे कुटुंबीय व जी. आर. एल. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कंपनीने आठ तासांनी ही ग्वाही दिली. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी प्रत्येक कुटुंबाला तातडीने १० हजारांची मदत देण्यात आली. सायंकाळी उशिरा शोकाकूल वातावरणात मृतकांवर अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला.
राजुरा येथून पाचगावकडे जाणाऱ्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या जी. आर. एल. कंपनीच्या हायवा ट्रकने भीषण धडक दिली. या धडकेत रवींद्र हरी बोबडे (४८, रा. पाचगाव), शंकर कारू पिपरे (५०, रा. कोची), वर्षा बंडू मांदळे (४१, रा. खामोना), तनु सुभाष पिंपळकर (१८, रा. पाचगाव), ताराबाई नानाजी पापुलवार (६०, रा. पाचगाव), ऑटोचालक प्रकाश मेश्राम (५०, रा. पाचगाव) या सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर जखमी निर्मला रावजी झाडे (५०, रा. पाचगाव) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर, भोजराज महादेव कोडापे (४०, रा. भुरकुंडा) यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता पाचगाव, कोची व खामोना येथील गावकरी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात खिन्न मनाने एकत्र आले होते. दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी आमदार, अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सतीश धोटे आदींनी मृतकांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले.
आमदार देवराव भोंगळे यांनी तहसीलदार ओमप्रकाश गौड यांच्या दालनात बैठक घेतली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कंपनीने मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे मान्य केले.