लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा (चंद्रपूर) : चिमूर-वरोरा मार्गावरील चारगाव बु गावाजवळील वळणावर अचानक धावत्या एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात वाहकाचा मृत्यू झाला, तर बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात मंगळवारी, दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता घडला. मृत वाहकाचे नाव सुरेश भटारकर (वय ५५, रा. राजुरा) आहे. त्यातील सहा प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणि तिथून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
चिमूर आगाराची (एमएच ४० एक्यू ६१८१) क्रमांकाची बस चिमूरहून वरोरामार्गे चंद्रपूरकडे निघाली होती. बसमध्ये २५ प्रवासी होते, असे समजते. ही बस वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव आल्यानंतर अचानक वळणावर स्टिअरिंग लॉक झाले. चालक सुरेश पुसनाके यांनी हे लक्षात येताच स्टिअरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
अपघात इतका भीषण होता की एसटी बसची वाहकाची बाजू चक्काचूर झाली. घटनेची माहिती चालक सुरेश पुसनाके यांनी वरिष्ठांना दिली. बसमधील १९ जखमींना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये वाहक सुरेश भटारकर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अन्य जखमींपैकी काहींना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली आणि सहा जणांना चंद्रपूरला हलवण्यात आले. अपघाताचा तपास शेगाव पोलिस करत आहेत. घटनास्थळी वरोरा आणि चिमूर आगाराच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
किरकोळ जखमींमध्ये १२ जणांचा समावेश आहेरेखा श्रीरामे (४५), रा. चंद्रपूर, सुमन बालुदे (५०), रा. लेदीखेड, कांताबाई नवले (६५), रा. भिसी, शामकला दडमल (४५), रा. सुमठाणा, भरत चिंचोलकर (३६), रा. चिमूर, वनिता दडमल (५३), रा. चिमू, मधुकर चिंचोलकर (८१), रा. चिमूर, मालती कापसे (५२), रा. चिमूर, सोनाबाई चिंचोलकर (६५), रा. धामणी, स्नेहा वाजूरकर (४५), रा. इंदिरानगर, चंद्रपूर, आंबेडकर सदाशिव मून (७५), रा. ल्लारशा, एसटी बसचालक सुरेश पुसनाके (३२), रा. वरोरा.
सहा महिन्यांतील दुसरा अपघातचिमूर आगारातील चालक एस. एस. परचाके हे २० मार्च २०२५ रोजी चिमूरहून नागपूरकडे एसटी बस घेऊन जात असताना पिंपळनेरी जवळ नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. यामध्ये काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. यानंतर हा दुसरा अपघात आहे.
गंभीर जखमीवासुदेव शेडमाके (६५), रा. वायगाव, शकील शेख (४०), रा. आळेगाव, वसंता देठे (६७), रा. बल्लारपूर, शाईन शेख (३०), रा. गडचांदूर, संजय कोवे (४०), रा. घुग्घुस, ईश्वर चिंचोलकर (७२), रा. धामणी. या जखमींवर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. यातील चारजण खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले.