धानापूर येथे सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान तणाव

By Admin | Updated: September 16, 2015 00:52 IST2015-09-16T00:52:54+5:302015-09-16T00:52:54+5:30

तालुक्यातील धानापूर येथे पार पडलेल्या सरपंचपदाच्या चुरशीत ऐनवेळी एका सदस्याने पॅनल बदलवून केलेल्या मतदानामुळे ....

Tension during the election of Sarpanchpad in Dhanapur | धानापूर येथे सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान तणाव

धानापूर येथे सरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान तणाव

गोंडपिपरी : तालुक्यातील धानापूर येथे पार पडलेल्या सरपंचपदाच्या चुरशीत ऐनवेळी एका सदस्याने पॅनल बदलवून केलेल्या मतदानामुळे धानापूर ग्रामपंचायतीवर वडस्कर पॅनलने आपला झेंडा फडकविला. तत्पूर्वी गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचे दंगा नियंत्रण पथकही दाखल झाले होते.
अतिशय चुरशीच्या ठरलेल्या धानापूर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत संजय वडस्कर यांच्या गटाचे एकूण नऊपैकी सात उमेदवार निवडून आले होते. मात्र प्रतिस्पर्धी गटाने वडस्कर गटातील तीन उमेदवारांचे मन वळविण्यात यश मिळविले. त्यानंतर त्यांना मतदानाच्या दिवसापर्यंत गुप्त ठिकाणी रवाना करण्यात आले होते. त्यामुळे मतदानाच्या सकाळपर्यंत वडस्कर गटाकडे चार तर प्रतिस्पर्धी गटाकडे पाच अशी सदस्य संख्या होती. गेल्या तीन दिवसांपासून वडस्कर गट अस्वस्थ होता. या गटाला गावकऱ्यांचाही पाठिंबा होता. वडस्कर गटाचे सदस्य फितूर झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गोंडपिपरीचे ठाणेदार अर्जुन बोत्रे यांनी धानापुरात चोख बंदोबस्त तैनात केला.
मात्र गावातील तणाव अधिकच वाढत असल्याचे पाहून जिल्हास्तरावरील दंगा नियंत्रण पथकालाही यावेळी पाचारण्यात आले. अशातच वडस्कर पॅनलच्या प्रतिस्पर्धी गटातील एका सदस्याने गावातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन वेळीच तो त्याच्या पूर्वीच्या पॅनलमध्ये दाखल झाल्याने संजय वडस्कर गटाकडील सदस्यांची संख्या पाच झाली. त्यातून सरपंचपदाची माळ याच गटाच्या गळ्यात पडली.
सरपंच म्हणून वनिता आत्राम तर उपसरपंचपदी प्रमोद वडस्कर यांची निवड झाली. धानापूरच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राजकीयदृष्ट्या तणावपूर्ण वातावरणात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. येथे जनभावनेचा विजय झाल्याचे मत संजय वडस्कर यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tension during the election of Sarpanchpad in Dhanapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.