३४ फळ्यांवर होणार तेंदूपत्ता संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:11+5:302021-03-18T04:28:11+5:30
नागभीड : फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. नागभीड वनपरिक्षेत्रात यावर्षी ३४ पानफळ्यांवर ...

३४ फळ्यांवर होणार तेंदूपत्ता संकलन
नागभीड : फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. नागभीड वनपरिक्षेत्रात यावर्षी ३४ पानफळ्यांवर तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येणार आहे.
घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजुरी असती तर ४३ पानफळ्यांवर संकलन करण्यात आले असते.
नागभीड तालुका जंगलव्याप्त आहे. नागभीड तालुक्यातील शेकडो गावे जंगलावर अवलंबून आहेत. शेतीसोबतच या तालुक्यातील अनेक नागरिक मोहफुले वेचणे, मध, डिंक व रानमेवा गोळा करणे यासारखी कामे करीत असतात. यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वाधिक लाभकारक आहे. तेंदूपत्ता संकलनाचे हे काम जवळपास एक महिना चालते. या महिनाभराच्या मिळकतीत कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर येण्यास मोठा हात लागत असतो. यावर्षी नागभीड वनपरिक्षेत्रात चार युनिट असून ३४ पानफळ्यांवर तेंदूपत्ता संकलन होणार आहे.
अभयारण्याचा या गावांना फटका
नागभीड वनपरिक्षेत्रातील नवखळा, कुनघाडा चक, कोरंबी, पेंढरी, चिचोली, कसर्ला, डोंगरगाव, चिंधीचक, किटाळी, बोरमाळा, हुमा, घोडाझरी व चिंधीमाल ही गावे घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रात आल्यामुळे या गावातील पानफळी केंद्र बंद करण्यात आली आहेत. परिणामी या गावातील नागरिकांना तेंदूपत्ता संकलनाच्या रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. या गावातील नागरिक तेंदूपत्ता संकलनाकडे 'जोड व्यवसाय' म्हणून पाहत होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर आणण्यासाठी तेेंदुपत्ता हंगाम मोठा आधार होता. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील अनेक गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाला मनाई करण्यात आली. त्यामुळे रोजगारासाठी कुठे जावे, हा फार मोठा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.