राजुरा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासन प्रशंसनीय काम करीत आहेत. शहरातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी व अद्ययावत प्रशासकीय इमारत निर्माण करण्यासाठी दहा कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सुभाष धोटे यांनी केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कोरोना संकटांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून राजुरा भूषण पुरस्कारची सुरुवात करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीबक ‘राजुरा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा राजुरा भूषण पुरस्कार बाळू संस्थेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सकस आहार देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाला नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, विलास बोंगीरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेवक आनंद दासरी, हरजितसिंह संधू, गजानन भटारकर आदी उपस्थित होते.