दूरसंचार विभागाची सेवा ‘नॉट रिचेबल’
By Admin | Updated: July 12, 2017 00:44 IST2017-07-12T00:44:05+5:302017-07-12T00:44:05+5:30
राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शहरात दूरसंचार विभागाची सेवा मात्र नकोशी झाली आहे.

दूरसंचार विभागाची सेवा ‘नॉट रिचेबल’
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शहरात दूरसंचार विभागाची सेवा मात्र नकोशी झाली आहे. सद्यास्थितीतील सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले असून अनेक ग्राहक दूरसंचार विभागाची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत.
मूल शहरातील शासकीय कार्यालय तथा शाळा-महाविद्यालय मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यादृष्टीने दूरसंचार विभागाची सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. यामुळे मूल शहरवासीयांना इंटरनेट सारख्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मागील आठ दिवसांपासून मूल तालुक्यात दूरसंचार विभागाचे भ्रमणध्वनी पाहिजे त्याप्रमाणात काम करीत नाही. थ्री जी सेवा आहे. परंतु, तेही केवळ नावापुरतीच. त्यामुळे अनेक ग्राहक आता भारतीय दूरसंचार विभागाचे सीमकार्ड बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. येथील दूरसंचार विभागाचे तत्कालीन अधिकारी यादव यांनी मूल शहरात थ्री-जी सेवा देण्यासाठी प्रयत्न करून थ्री-जी सेवेचा लाभ मूलवासीयांना मिळवून दिला. परंतु यादव यांची बदली होताच दूरसंचार विभागाच्या सेवेचे तीन-तेरा वाजले आहे.
मूल शहर हे तालुक्याचे ठिकाणी असून गेल्या २५ वर्षांपासून नगर पालिका कार्यरत आहे. या ठिकाणी महसूल विभागाचे उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय, यासह विविध कार्यालय कार्यरत आहेत. परंतु भारतीय दूरसंचार निगमकडून योग्य सेवा मिळत नाही. यामुळे विविध विभागाच्या कार्यालयांना व व्यापाऱ्यांना इंटरनेट व भ्रमणध्वनी सेवेची अडचण येत आहे.