अवैध रेती चोरीत तहसीलदारांचा हात

By Admin | Updated: November 24, 2014 22:55 IST2014-11-24T22:55:57+5:302014-11-24T22:55:57+5:30

या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध रेती चोरीला येथील तहसीलदारांच्या प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

Tehsildar's hand in illegal sand | अवैध रेती चोरीत तहसीलदारांचा हात

अवैध रेती चोरीत तहसीलदारांचा हात

भद्रावती : या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध रेती चोरीला येथील तहसीलदारांच्या प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
३० सप्टेंबरला तालुक्यातील सर्व रेतीघाटांची लिज समाप्त झाली. त्यानंतर रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात रेती घाटावरुन रेतीचा उपसा करून अवैध वाहतुकीच्या माध्यमातून विक्री सुरू केली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील कचराळा, जेना, चालबर्डी रै. कोची, बरांज, मांगली, पिरर्ली, चंदनखेडा, पावना, घोटनिंबाळा, चिरादेवी, बोनथळा यासह अनेक रेती घाटावरुन रेतीची चोरी सुरू आहे. लहान व गरीब ट्रॅक्टर चालक व मालकांवर कारवाई करुन आपण ही अवैध रेती चोरी पकडत आहो, असा भास तहसीलदार सचिन कुमावत निर्माण करीत आहो, असा आरोप गैणवार यांनी निवेदनातून केला आहे. याउलट मोठे रेती तस्कर जेसीबी मशिनच्या साह्याने हायवा व टिप्पर या ट्रकच्या माध्यमातून राजरोसपणे रेतीचे चोरी करीत असून याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष आहे. मोठ्या रेती तस्कारात आणि तहसीलदारात ‘अर्थ’ पूर्ण करार झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी चंदनखेडा येथील रेतीघाटावरुन त्या मंडळातील तीन तलाठ्यांनी कारवाई केली असता त्यांच्यावर ट्रॅक्टर मालक आणि त्यांच्या मजुरांनी प्राणघातक हल्ला केला. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. परंतु तहसीलदारांनी या प्रकरणी विशेष आस्था दाखविली नसल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाचे वरोरा उपविभागाचे अध्यक्ष जे. टी. बलकी यांनी केला. याउलट नव्यानेच रुजू झालेले परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत फसके यांनी आपल्या कर्तव्यतत्परतेने रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न चालविला आहे.
तहसीलदारांच्या संगनमताने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध रेती चोरीला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आळा घालावा, यात लिप्त असलेल्या तहसीलदारांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी गैणवार यांनी निवेदनातून केली आहे. कारवाई न झाल्यास भाकपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूलमंत्री आणि इतरांना पाठविण्यात आल्या आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Tehsildar's hand in illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.