भंगार वेचणाऱ्या निराधारांना दिला तहसीलदाराने आधार
By Admin | Updated: March 1, 2016 00:46 IST2016-03-01T00:46:02+5:302016-03-01T00:46:02+5:30
राजुरा तालुक्यातील विरुर येथील मागील २५ वर्षांपासून भंगार वेचून जीवन जगणाऱ्या व विरुर रेल्वे स्थानकाजवळील ...

भंगार वेचणाऱ्या निराधारांना दिला तहसीलदाराने आधार
धर्मेश फुसाटे यांचे निर्देश : गरजुंना योजनेचा लाभ द्या
विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील मागील २५ वर्षांपासून भंगार वेचून जीवन जगणाऱ्या व विरुर रेल्वे स्थानकाजवळील एका छोट्याशा झोपडीत वास्तव्य करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन व्यक्तींना तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला.
संबंधित पटवारी किंवा ग्रामसेवकाने याकडे लक्ष न दिल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून ते वंचित रहात होते. मात्र राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिल्याने भंगार वेचून आयुष्य जगणाऱ्या त्या दोघांना आधार मिळाला आहे.
राजुरा तालुक्यातील विरुर येथे मागील २५ वर्षांपासून विरुर रेल्वे स्थानकाजवळील एका छोट्याशा झोपडीत बुचय्या पोचम आत्राम (६७ वर्ष) व बब्बू तुराबमियॉ (६५ वर्ष) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तसेच भंगार वेचून आपला जीवनाचा गाडा कसबसा हाकत आहे. मागील २५ वर्षांपासून विरुर येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, बँकेचे पासबूक व इतर कागदपत्र आहेत. मात्र त्यांना शासनाचा कोणताच लाभ मिळत नव्हता. याकडे गावातील नागरिक किंवा शासकीय कर्मचारी लक्ष देत नव्हती. राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी विरुर येथे काही दिवसांपूर्वी दौरा केला. या दरम्यान यांचे लक्ष या दोघांवर गेले. त्यांची दयनीय अवस्था पाहून संजय गांधी योजनेचा लाभ देण्याकरीता स्वत: त्यासाठी लागणारे कागदपत्र गोळा केले. त्यानंतर प्रस्ताव तयार केला. केवळ दहा दिवसातच संबंधित प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांना दर महिन्याला आता मानधन मिळत असल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यातील एकाचा आंतरजातीय विवाह आहे.
गरजू लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित न ठेवता त्यांना रितसर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी सूचना यावेळी धर्मेश फुसाटे यांनी तलाठ्याला दिली. (वार्ताहर)