तहसील कार्यालय गर्दीने फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:38+5:302021-01-19T04:29:38+5:30
विजयी उमेदवारांनी काढली वाजत-गाजत मिरवणूक चंद्रपूर : १५ जानेवारीला जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. त्यानंतर प्रत्येकाचे लक्ष सोमवारी ...

तहसील कार्यालय गर्दीने फुलले
विजयी उमेदवारांनी काढली वाजत-गाजत मिरवणूक
चंद्रपूर : १५ जानेवारीला जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. त्यानंतर प्रत्येकाचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले होते. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच तहसील कार्यालय परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी करणे सुरू केले होते. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षशर: गर्दीने फुलला होता.
सकाळी १० वाजता मतमोजणी सुुरू झाली. तीन फेऱ्या झाल्यानंतर मतमोजणीचा निकाल घोषित केला जात होता. दरम्यान, ज्या गावांचा नंबर आला त्या गावातील नागरिक स्पीकरच्या आवाजाकडे लक्ष ठेवून होते. चंद्रपूर तालुक्यामध्ये ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. शहराशेजारी असलेल्या गावातील निवडणूक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या गावांकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते.
----
बाॅक्स
विजयानंतर थेट पक्ष कार्यालयात
सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. गावागावांतून आलेले उमेदवार त्यांचे सहकाऱ्यांचे निकालाकडे लक्ष लागले होते. दरम्यान, विजयाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या सहकाऱ्यांना आलिंगन घेत एकमेकांना शुभेच्छा देत होते. त्यानंतर मात्र आपापल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयात जाऊन नेत्यांचे आशीर्वाद घेत असल्याचे चित्र आज बघायला मिळाला, तर दुसरीकडे चंद्रपूर येथील बसस्थानक परिसरात भाजपने एक पेंडार उभारला होता. विजयी झालेल्या उमेदवारांचे बॅण्ड लावून स्वागत करीत त्याचा उत्साह वाढविताना दिसून आला.