धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: June 21, 2015 01:50 IST2015-06-21T01:50:21+5:302015-06-21T01:50:21+5:30
दोन युवकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या एका युवकाने शनिवारी दुपारी स्वत:च्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली.

धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या
चंद्रपूर: दोन युवकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या एका युवकाने शनिवारी दुपारी स्वत:च्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. स्थानिक नगिनाबाग परिसरात या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संदीप इंगोले (२२) असे मृताचे नाव आहे.
घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला तेथे आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृताच्या नातलगांनी चांगलाच राडा केला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
मृत संदीपचे कुटुंब स्थानिक नगिनाबाग परिसरात किरायाच्या घरात राहतात. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन युवक संदीपच्या घरात शिरले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोर संदीपला बेदम मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर या युवकांनी संदीपच्या घरातील टीव्ही उचलून नेला. जाताना पैसे परत करण्याचे फर्मानही त्यांनी सोडले. या साऱ्या प्रकारामुळे घाबरलेल्या संदीपने दुपारी १२ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मृताच्या कुटुंबाने दिली.
मृताचा भाऊ समीर इंगोले याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नगिनाबाग परिसरात आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय करणारा दिनेश सहारे हा त्याच्या एका सहकाऱ्याला घरी घेऊन आला आणि त्या दोघांनी संदीपला मारहाण केली. त्यानंतर दुपारी त्याने घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली.
मृत संदीप सरळ स्वभावी
मृत संदीप कधी-कधी आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात जात असे. सरळ स्वभावी आणि अतिशय संवेदनशिल असलेल्या संदीपचे परिसरात अनेक मित्र आहेत. त्यांना संदीपच्या स्वभावाची माहिती आहे. आज घडलेला प्रकार संदीपच्या मनाला भिडला. त्यातूनच त्याने स्वत:ची जीवनयात्रा संपविली.
आरोपींना अटक करा
संदीपला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दिनेश सहारे व त्याच्या सहकाऱ्याला तातडीने अटक करण्याची मागणी संदीपच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.