नाशिकची चमू चंद्रपुरात
By Admin | Updated: August 8, 2015 01:07 IST2015-08-08T01:07:41+5:302015-08-08T01:07:41+5:30
येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी नाशिक विद्यापिठाची तीन सदस्यीय चमू शुक्रवारी चंद्रपुरात पोहचली.

नाशिकची चमू चंद्रपुरात
चंद्रपूर: येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांचा आढावा घेण्यासाठी नाशिक विद्यापिठाची तीन सदस्यीय चमू शुक्रवारी चंद्रपुरात पोहचली. या चमूने जिल्हा शासकीय रुग्णालयासह महाविद्यालयासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. नव्या इमारतीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांवर त्यांनी समाधान व्यक्त केले. हे वेद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे होते, अशीही पुस्ती त्यांनी जोडली. या वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीयादेखील शुक्रवारीच पूर्ण करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.यू.बी.मुनघाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विद्यापिठाच्या निरीक्षक समितीचे अध्यक्ष डॉ.एम.पी.परचंड, डॉ.समीर गोलावार व डॉ.विनय हजारे हे येथे आले होते. त्या चमूने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व वॉर्ड, आॅपरेशन थिएटर, आयसीयू आदींची पाहणी केली. त्यावर प्रतिक्रीया देताना या चमूतील सदस्यांनी हे वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच व्हायला हवे होते, असेही सांगितले. ही चमू आपला अहवाल लवकरच शासनाला सादर करणार आहे. या पाहणीदरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दीक्षित, डॉ.अनंत हजारे, मंगेश गुलवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)