शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढणार
By Admin | Updated: September 27, 2014 01:25 IST2014-09-27T01:25:46+5:302014-09-27T01:25:46+5:30
पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढणार
देवाडा (खु.) : पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. याबाबत सर्व शिक्षक संघटनांची समस्या निवारण सहविचार सभा पोंभुर्णा पंचायत समितीत संवर्ग विकास अधिकारी सुशांत गाडेवार, गटशिक्षण अधिकारी अशोक सावरकर, लेखाधिकारी अशोक नळे, शिक्षण विस्तार अधिकारी ललिता कन्नाके यांच्यावतीने आयोजित करण्यात आली.
यावेळी मागील सभेत मांडलेल्या व अद्याप न सुटलेल्या समस्यांवर आधी व त्यानंतर अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात शिक्षकांचे वेतन नियमित १ तारखेला अदा करणे, वेतनाची रक्कम वेळेत मिळूनही मुद्दाम उशीर लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळापत्रक ठरवून देणे, भविष्य निर्वाह निधीचे इतर तालुक्यातून बदलून आलेल्या शिक्षकांचे व कार्यरत शिक्षकांचे थकीत हप्ते, पावत्या वाटपाचे नियोजन, बऱ्याच दिवसांपासून थकीत अरिअर्स बिले, अप्रशिक्षित शिक्षकांचे अरिअर्स, सेवापुस्तके पडताळणीसाठी पाठविणे व अद्ययावत करणे, शालेय पोषण आहार, महिलांचे थकीत मानधन, अरिअर्स न मिळूनही तो आयकरात दाखवून शिक्षकांचे आर्थिक नुकसान करणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, विनाकारण जिल्हास्तरावर डेप्युटेशनवर असलेल्यांना परत बोलावणे, २००५ पूर्वी सेवेत लागलेल्यांची खात्यावर जमा न झालेली भविष्य निधीची रक्कम परत करणे, प्रलंबित बांधकाम निधी व मेडिकल बिले आदि समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काही समस्या येत्या आठ दिवसांत तर काही १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी संघटनेला दिले. शिक्षकांचे नेतृत्त्व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे हरीश ससनकर, सुधाकर कन्नाके यांनी केले.(वार्ताहर)