कल्याण निधीतून साजरा होणार शिक्षक दिन

By Admin | Updated: September 1, 2015 00:45 IST2015-09-01T00:45:46+5:302015-09-01T00:45:46+5:30

शिक्षक कल्याण निधी गोळा करुन शिक्षक दिन साजरा करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांना दिले आहे.

Teacher's Day to be celebrated from Kalyan fund | कल्याण निधीतून साजरा होणार शिक्षक दिन

कल्याण निधीतून साजरा होणार शिक्षक दिन

शासनाचे आदेश : निधीसाठी शिक्षकांची धावपळ
ंनागभीड : शिक्षक कल्याण निधी गोळा करुन शिक्षक दिन साजरा करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांना दिले आहे. सदर आदेश २७ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
शिक्षक दिन कसा साजरा करायचा व त्या दिवशी शिक्षक कल्याण निधी कशाप्रकारे गोळा करायचा याबाबत जिल्हा, पंचायत समिती, गाव, नगर व शहर पातळीवर समित्या स्थापन करण्याच्या सूचना या आदेशात करण्यात आल्या आहेत. शिक्षक दिनाबाबत जागृती करण्यासाठी गावोगावी प्रचार सभा घेणे, सर्व विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी वातावरण निर्मिती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षक कल्याण निधी गोळा करण्यासाठी कागदी बिल्ल्यांची छपाई करुन ते विक्री करणे व शिक्षक कल्याण निधी जमा करणे, यासाठी प्रत्येक महापालिका व जिल्हास्तरावरुन आवश्यक तेवढे बिल्ले छापून घेण्याच्या सूचना आदेशात आहेत. बिल्ल्यासाठी वापरावयाच्या कागदाचा रंग पांढरा ठरविण्यात आला असून एका बिल्ल्याची किंमत ५ रुपये ठेवण्यात आली आहे.
आवश्यकतेप्रमाणे कागदी बिल्ले योग्य त्या यंत्रणेमार्फत छापण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच शिक्षक कल्याण निधी जास्तीत जास्त गोळा करण्याचे काम गावातील कार्यकर्त्यांमार्फत करावे असेही यात म्हटले आहे. कागदी बिल्ल्यांची छपाई केल्यानंतर त्याचा योग्यरितीने हिशेब ठेवण्यासाठी दक्षता घेण्यात यावी व जिल्ह्याच्या वरिष्ठ लेखा परिक्षकाकडून हिशेब तपासून घ्यावा व तपासणी अहवाल शिक्षक संचालक पुणे यांच्या स्तरावर पाठवावा, अशी सूचना यात करण्यात आली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक व करमणूक कार्यक्रम, चित्रपटाचे कार्यक्रम, वर्क्तृत्व स्पर्धा व चर्चासत्र, ग्रामशिक्षण समितीच्या बैठका, खेळाचे सामने आदी कार्यक्रम घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Teacher's Day to be celebrated from Kalyan fund