७ तारखेच्या आत शिक्षकांचा वेतन आढावा घेणार
By Admin | Updated: October 30, 2014 22:49 IST2014-10-30T22:49:49+5:302014-10-30T22:49:49+5:30
जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न होवून बसला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्येही काही तालुक्यात शिक्षकांना वेळेवर वेतन मिळाले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली.

७ तारखेच्या आत शिक्षकांचा वेतन आढावा घेणार
चंद्रपूर : जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न होवून बसला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्येही काही तालुक्यात शिक्षकांना वेळेवर वेतन मिळाले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली. काही ठिकाणी शालार्थ वेतन प्रणालीच्या आड मुद्दाम काही शिक्षकांचे व शाळांचे वेतन थांबवण्याचे प्रकार सुरू आहेत. या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत प्रत्येक पंचायत समितीमधून वेतनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात येईल व दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
जिल्हा परिषदेमार्फत वेतनाबाबत पंचायत समितीकडून आॅनलाईन आढावा घेण्यात येणार आहे. जि.प. पासून ते शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होताना वेतन देयकाचा संपूर्ण टप्प्यांचा अहवाल आता पंचायत समिती अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेला वेळोवेळी सादर करावा लागणार आहे.
शालार्थ वेतन प्रणाली शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये कार्यालयातील लिपीकाचे काम कमी होवून मुख्याध्यापकच वेतन काढण्याची कार्यवाही करत आहेत तसेच हे काम त्यांना आॅनलाईन करावे लागते, परिणामी अनेक मुख्याध्यापकांना ते जमतही नाही तेव्हा ते इतरांची मदत घेवून अतिरिक्त पैसे खर्च करून कसेबसे वेतन देयक वेळेवर सादर करतात. मात्र वेतन प्रक्रियेचे संपूर्ण काम कमी होवूनही पंचायत समितीस्तरावरील कर्मचारी, अधिकारी कारण नसताना दिरंगाई करतात व कधीच वेळेवर वेतन देत नाहीत. कधी शालार्थ वेतनप्रणालीचे तर कधी जिल्हास्तरावरुन निधी न आल्याचे कारण सांगतात. पंचायत समिती स्तरावर आलेली आॅनलाईन देयके तपासून जिल्हास्तरावर पाठविण्याचे अगदी सोपे काम या कर्मचाऱ्यांना असते. तेही स्वत: न करता या कामात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांवर काम सोपविले जाते. त्यामुळे हेतुपुरस्परपणे काही शिक्षक व शाळांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने केला.
या अनियमितेची चौकशी करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, मोरेश्वर बोंडे, वासुदेव गौरकार, सुभाष बेरड, चंदा खांडरे, शालिनी देशपांडे, विनोद कुमारे, भास्कर डांगे, पंकज उद्धरवार, कुमरे, मोरेश्वर हनमलवार यांच्यासह संघटनेतील अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)