शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा भरविण्यास मनाई
By Admin | Updated: November 21, 2015 00:56 IST2015-11-21T00:56:03+5:302015-11-21T00:56:03+5:30
शाळा सुरू होवून अर्धे सत्र संपले तरीही शिक्षकाची पूर्तता न झाल्याने पालकानी संताप व्यक्त करून गुरूवारी शाळा व्यवस्थापन समितीचे ....

शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा भरविण्यास मनाई
कुलूप ठोकण्याचा इशारा : विद्यार्थी-शिक्षक तीन तास शाळेबाहेर
कोठारी : शाळा सुरू होवून अर्धे सत्र संपले तरीही शिक्षकाची पूर्तता न झाल्याने पालकानी संताप व्यक्त करून गुरूवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर लोहे यांनी पालकासह शाळेच्या गेटवर शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यास मनाई केली. त्यामुळे सर्वत्र तारांबळ उडाली. ही वार्ता पंचायत समितीमध्ये पोहचताच संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी वेळीच हालचाल करून संतापलेल्या पालकांना सोमवारपर्यंत शिक्षकाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासानंतर शाळेच्या गेटचे कुलूप उघडून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला.
चालु सत्राच्या सुरूवातीलाच जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षकांची कमतरता असून शाळेत त्वरीत शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून चालढकल करीत शिक्षकाची नियुक्ती केली नाही. शाळेत वर्ग १ ते ४ असून तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील एक प्रभारी मुख्याध्यापक असून कार्यालयीन कामकाजात ते सतत व्यस्त असतात. त्यांना वर्ग घेण्यास वेळ मिळत नाही. परिणामी दोन शिक्षकांना चार वर्गाचा भार सांभाळावा लागतो. शाळेत शिक्षकाचे पदे रिक्त असल्याने त्याचा गंभीर परिणाम मुलांच्या अध्यापनात होत आहे. शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सतत अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या व शाळेच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी मोरेश्वर लोहे यांनी पालकांसोबत सकाळी दहा वाजतापासून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत प्रवेशापासून अडविले. त्यानंतर संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजबे व प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू यांनी मध्यस्ती करून शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिले व तीन तासानंतर गेट उघडण्यात आला. शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)