विकासासाठी टाटांनी दिला मदतीचा शब्द
By Admin | Updated: January 6, 2017 01:07 IST2017-01-06T01:07:12+5:302017-01-06T01:07:12+5:30
५ जानेवारी हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी इतिहासात नोंद राहील असा ठरला.

विकासासाठी टाटांनी दिला मदतीचा शब्द
देखणा समारंभ : विकासाचे नवे पर्व सुरू ; नागरिकांची भरगच्च उपस्थिती
चंद्रपूर : ५ जानेवारी हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी इतिहासात नोंद राहील असा ठरला. कितीतरी वर्षांपूर्वी जेआरडी टाटा चंद्रपुरात आले होते. चंद्रपुरातील लोह, सागवान, बांबू आणि खनिजांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी उद्योगाची जोड देण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र दळणवळणांच्या सुविधांमुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नव्हते. मात्र त्यांच्या कुटुंबातील वारस असलेले रतन टाटा यांनी ५ जोनवारीला चंद्रपुरात येऊन बांबू प्रशिक्षण केंद्र्राबाबत सामंजस्य करार केला. एवढेच नाही तर, चंद्रपूरच्या विकासात पाठीशी राहण्याचा शब्द देवून भविष्यामध्ये देशात चंद्रपूर शहर पुढे जाईल, असा शुभसंकेतही आपल्या मनोगतातून दिला. औद्योगिक क्षेत्रात अग्रक्रमावर असलेल्या टाटा उद्योगसमूहाकडून मिळालेल्या या शब्दामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचे नवे पर्व आता लवकरच सुरू होणार असल्याचा आशावाद जिल्हावासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.
चंद्रपूरच्या क्लब ग्राऊंडवर हजारो जनमानसांच्या साक्षीने बांबूंच्या खुर्चीवर बसून अभिनव पध्दतीने बांबू प्रशिक्षण केंद्राच्या सामंजस्य करारावर टाटा उद्योग समूहाचे व्यंकटरमनन व मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर हा करार रतन टाटा व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केला, त्या प्रसंगी कडाडणाऱ्या टाळ्यांतून जणू उद्याच्या विकासपर्वाचे स्वागत झाले.
कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर रतन टाटा यांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली. बांबूपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पांचे आणि घोट (जि. गडचिरोली) येथील प्रकल्पाने तयार केलेल्या बांबू उत्पादनांची पहाणी केली. जंगलाचा जिल्हा असलेल्या या मातीत त्यांचे स्वागतही वन्यप्राणी आणि पक्षांची वेषभुषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी पुस्तके देऊन वनभुमीला साजेसे असे केले. वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रतन टाटा यांच्यासह अन्य पाहुण्यांना वाघाच्या प्रतिकृती भेट देवून हा जिल्हा पाहुण्यांच्या आठवणीत राहील याची काळजी घेतली. चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास विशद करणारी चित्रफीत, बांबु प्रशिक्षण केंद्र्राचे स्वरूप विशद करणारी चित्रफीत, सुक्ष्म नियोजन प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर विविध योजना व प्रकल्पांबाबतची चित्रफीत, सजविलेला सभामंच, काढलेल्या रांगोळया यामुळे हा समारंभ देखणा ठरला. (जिल्हा प्रतिनिधी)