तंटामुक्त समिती अध्यक्षपदाचा वाद सुरूच
By Admin | Updated: December 1, 2014 22:51 IST2014-12-01T22:51:55+5:302014-12-01T22:51:55+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी ग्रामसभा होवून तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अशोक नारायण बंडीवार यांचा

तंटामुक्त समिती अध्यक्षपदाचा वाद सुरूच
तळोधी(बा.) : येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी ग्रामसभा होवून तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अशोक नारायण बंडीवार यांचा एक मताने विजय झाला. मात्र आपल्याला विजयी घोषित न केल्याचा आरोप अशोक बंडीवार यांनी येथील साईबाबा मंदिरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशोक बंडीवार, प्रमोद पाकमोडे व जीवन निकेसर हे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात अध्यक्ष व सचिव यांनी ग्रामसभेला विचारणा केली असता, गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचे ग्रामसभेने सुचविले. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या सभागृहात पोलीस संरक्षणात अध्यक्ष व सचिवाने मतदानाची प्रक्रीया पार पाडली. मतदान अतिशय शांतेतत पार पडले. त्यानंतर मतमोजणी करण्यात आली. त्यात अशोक बंडीवार यांना २५७ मते, प्रमोद पाकमोडे यांना २५६ मते व जीवन निकेसर यांना ४७ मते मिळाली. यात पाच मते अवैध असल्याचेही जाहीर करण्यात आले.
अशोक बंडीवार यांना सर्वाधिक मते प्राप्त झाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र पराभूत उमेदवार प्रमोद पाकमोडे यांनी या निवडीवर आक्षेप नोंदवित ग्रामविकास अधिकारी व सरपंच सविता जमदार यांच्यावर दबाब आणला, आणि निवडणूक निकाल घोषित करण्यासाठी अडथळा निर्माण केला, असा आरोप बंडीवार यांनी केला आहे.
पोलीस संरक्षण असताना अशाप्रकारे विजयी झालेल्या उमेदवाराला विजयी न करता निवडणूक स्थगित करण्याचा सभाध्यक्षांना कोणता नैतिक अधिकार आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, तसेच पराभूत उमेदवार प्रमोद भैय्याजी पाकमोडे हे एका खासगी संस्थेत शिक्षक आहेत. असे असताना संस्थेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या निवडणुकीत उभे राहिले. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.
एका मतदाने विजयी झाल्यानंतरही आपल्याला सभाध्यक्ष सरपंच सविता जमदार व ग्रामविकास अधिकारी रणदिवे व पराभूत उमेदवार प्रमोद पाकमोडे यांच्याकडून अपमानीत व्हावे लागले, असे बंडीवार यांनी सांगितले. याप्रकरणी बंडीवार यांनी नागभीडचे तहसीलदार व पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई करावी, अशी मागणी यावेळी माजी उपसरपंच वामन मदनकर, अशोक बंडीवार, मनोज वाढई, बल्लू गेटकर, जीवन निकेसर, संजय मारमते, प्रभाकर मारभते, सोनु नुराणी यांनी पत्रकार परिषदेत केली. (वार्ताहर)