वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सुरू आहे तेंदूपत्ता संकलन

By Admin | Updated: May 20, 2015 01:45 IST2015-05-20T01:45:48+5:302015-05-20T01:45:48+5:30

एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबाना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.

Tandupta collection is under wildlife | वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सुरू आहे तेंदूपत्ता संकलन

वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली सुरू आहे तेंदूपत्ता संकलन

विरुर (स्टे.) : एका महिन्यापुरता का होईना, हजारो कुटुंबाना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ता तोडाईच्या कामाला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली हजारो मजूर जंगलात तेंदूपत्ता तोडतानाचे दृष्य बघायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करणे हाच व्यवसाय आहे. उन्हाळा आला की, कंत्राटदाराच्या दिवाणजीचे निमंत्रण केव्हा येते, याची ही कुटुंबे चातकासारखी वाट बघतात. ग्रामीण भागात उन्हाळ्यात शेतीची कामे संपल्याने तसेच मजुरांना रोजगार मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ताचा व्यवसाय अविरत सुरू आहे. यासाठी प्रत्येक कार्यालयात तेंदू विभाग असतो. या भागात तेंदू हंगामाला मे महिन्यात प्रत्यक्ष सुरूवात होते. १५ ते २० दिवसांचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर महिन्यात तेंदू युनिटच्या लिलावाची जाहिरात विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होेते.
यानंतर आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बडे कंत्राटदार आदिवासीबहुल भागात लिलावासाठी दाखल होतात. वनविभागाने तेंदू युनिटचा लिलाव केल्यानंतर मे महिन्यात तेंदू संकलनाच्या कामाला सुरुवात होते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतीवर राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर या तोडाईच्या कामात स्वत:ला गुंतवून घेऊन चार पैसे जमवायचे, असा क्रमच जणू ठरुन गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कुटुंब जादा पैसे मिळावे म्हणून या तेंदू संकलनाच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात दाखल होतात. या जिल्ह्यातील आदिवासी जनता हेच काम करतात. पण येथे काम जास्त व हात कमी अशी स्थिती असते म्हणून कंत्राटदार बाहेरुन मजूर आणतात. तेंदू पानाचे काय करतात. हे शहरी भागातील लोकांना माहिती नसेल. शहरातील लोकांना सिगारेट परिचयाची आहे. मात्र बिडीची त्यांना ओळख नाही. ग्रामीण भागातील लोकांना सिगारेट ओढणे परवडत नाही म्हणून ते बिडी पितात. ग्रामीण भागात बिडी प्रसिद्ध आहे. तेंदूच्या पानापासून बिडी तयार करण्यात येते.
आदिवासी कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंतचे लोक तेंदू संकलनाचे काम करतात. मुलामुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य, सावकारांचे देणे, वर्षभराचे आर्थिक नियोजन आदी विविध कामे तेंदूच्या मजुरीतूनच करण्यात येतात. तेंदू वेचताना सत्तर पानांचा एक पुडा याप्रमाणे एका मजुराला दिवसाला शंभर पुडके करुन द्यावे लागतात. काही कंत्राटदार मजुरांची आर्थिक लूट देखील करतात. तेंदुपत्ता व्यवसायात उद्योजक कोट्यावधीश झाले तर तेंदू संकलनाचे काम करणारे मजुर मात्र आजही अर्धपोटी राहत आहे. हा तेंदूपत्ता मजुरावरील अन्याय असून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम कुणीही केले नाही. मागील दहा वर्षात विदर्भातील तेंदूपत्ता घटक खरेदी केलेला ठेकेदार आणि मजुरांचा विचार केल्यास मजूर आहे त्याच ठिकाणी आहे. परंतु ठेकेदार मात्र मोठे झाले. ठेकेदार व मजुरांची दरी वाढत गेली. याकडे लक्ष कोण देणार? बिडी शौकीनांचे प्रमाण कमी होत असल्याने एका दृष्टीने या व्यवसायाला अखेरची घरघरसुद्धा लागली आहे. असे असले तरी हजारो आदिवासींची रोजीरोटी असलेला हा व्यवसाय पूर्व विदर्भात अविरत सुरू आहे.
सध्या पहाटेपासून मजुर आपल्या मुलाबाळांसह जंगलात पाने आणण्यासाठी जात आहे. त्यांना अनेक वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. मागील वर्षांपासून वन्यप्राण्यांचे झालेली हल्ले बघता मजुरामध्ये कुठेतरी भितीचे वातावरण आहे. मात्र न डगमगता पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. ईकडे आड आणि दुसरीकडे विहिर अशी स्थिती तेंदूपत्ता मजुरांची झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Tandupta collection is under wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.