तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचा आजपासून बेमुदत संप

By Admin | Updated: April 26, 2016 00:35 IST2016-04-26T00:35:28+5:302016-04-26T00:35:28+5:30

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

Tallathi and Board Officer coordination federation of today | तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचा आजपासून बेमुदत संप

तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचा आजपासून बेमुदत संप

दाखल्यांसाठी होणार धावपळ : प्रशासकीय कामे होणार प्रभावित
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबण्याची शक्यता आहे.
या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा पटवारी संघ तथा मंडळ अधिकारी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती विदर्भ पटवारी संघाचे अध्यक्ष अरुण झाडे आणि मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे यांनी दिली आहे.
तलाठी साजांची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा व संगणकीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, अवैध गौण खनिज कामातून तलाठी यांना वगळणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, जिल्हास्तरावरील मागण्यांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जलदगतीने निपटारा होणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यासंदर्भात ४ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. मात्र याची दखल घेण्यात न आल्याने २६ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येत आहे. या आंदोलनात राज्यातील पटवारी व मंडळ अधिकारी सहभागी होणार आहेत.
मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पालकमंत्री, विरोधी पक्षनेता, आमदार, विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन देण्यात आलेले आहे, असेही प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे. त्यामुळेच या संपात जिल्ह्यातील पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुवल, विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष महादेव राजुरकर, विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अशोक भोसले, गवस यांच्यासह संजय अनव्हाने, शे. बा. चव्हाण, डी.एम. पाटील, अशोक कोकाटे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tallathi and Board Officer coordination federation of today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.