टाॅकीज सुरू मात्र प्रेक्षकच फिरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:47+5:302021-03-24T04:25:47+5:30
बल्लारपूर : टॉकीज सुरू झाली. मात्र प्रेक्षकच येईना. काही कमाईही होईना, अशी गंभीर स्थिती टॉकीज मालकांची, चित्रपट व्यावसायिकांची ...

टाॅकीज सुरू मात्र प्रेक्षकच फिरकेना
बल्लारपूर : टॉकीज सुरू झाली. मात्र प्रेक्षकच येईना. काही कमाईही होईना, अशी गंभीर स्थिती टॉकीज मालकांची, चित्रपट व्यावसायिकांची होऊन बसली आहे. प्रेेेक्षक हळूहळू येतीलच आणि डबघाईतील हा व्यवसाय परत तग धरणार या आशेने काही टॉकीज मालकांनी अशा विपरीत स्थितीत टॉकीज सुरू केल्या असून तिथे नियमित खेळ दाखवणे सुरू आहे.
कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर टॉकीज परत सुरू करण्याची अनुमती शासनाकडून मिळाली. त्याचे काही महिन्यानंतरच जानेवारीत चंद्रपूर येथील अभय टॉकीज तसेच तसेच बहू पडदा मिराज या दोन टॉकीज सुरू झाल्या. या दोन महिन्यात प्रेक्षकांचा खूपच अल्प म्हणजे क्षमतेच्या दोन किंवा तीन टक्के प्रेक्षक असा प्रतिसाद मिळत आलेला आहे. यातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बिल भागविण्याएवढीच कमाई होत आहे. प्रेक्षकांअभावी बरेच खेळ रद्द करावे लागले. कोरोना काळात नवीन मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. काही प्रदर्शित झाले आहेत ते फक्त ओटीटीवर! त्यामुळे टॉकीजवर इंग्रजी व तामिळ भाषेतील हिंदी डब केलेले चित्रपट लावावे लागत आहेत. सलमान, शाहरुख, अक्षय कुमार या सारख्या बड्या कलाकारांचा चित्रपट लागल्यास प्रेक्षक टॉकीजकडे वाढू शकतात. पण तसा मोठा चित्रपट येत्या दोन महिन्यांपर्यंत टॉकीजमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे डब चित्रपटच लावावे लागत आहे, असे टॉकीज मालकांचे म्हणणे पडते.
बाॅक्स
टाॅकीज बंदचा असाही फटका
अभय टॉकीजचे मालक परमानंद पोटदुखे म्हणाले, प्रेक्षकांना सवय लावण्याकरिता व त्यांना परत टॉकीजकडे वळविण्याकरिता टॉकीज सुरू ठेवणे गरजेचे आहे. सोबतच लाखो-करोडो रुपये किमतीची यंत्रसामग्री खराब होऊ नये या करिता त्या चालवीत राहणे आवश्यक ठरते. टॉकीज सुरू ठेवण्याची ही दोन मुख्य कारणे आहेत.
कोरोना पूर्व काळात चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर येथे सहा टॉकीज तसेच ब्रह्मपुरी, नागभिड आणि वरोरा येथे प्रत्येकी एक अशा नऊ टॉकीज सुरू होत्या. कोरोना काळानंतर त्यातील चंद्रपुरातील अभय आणि मिराज दोनच टॉकीज या घडीला सुरू आहे. बाकी बंद आहेत.
टॉकीज बंद असल्याने तेथील कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
शासनाच्या जाचक अटी विरोधात महाराष्ट्रातील टॉकीज व्यावसायिकांनी पाच वर्षांपूर्वी तीन महिने टॉकीज बंद ठेवल्या होत्या. बंद मागे घेतल्यानंतर नवीन चित्रपटांचे प्रदर्शन सुरू असताना सुद्धा प्रेक्षकांना परत येण्याकरिता कितीतरी महिने वाट पहावी लागली होती. आता तर नवीन चित्रपटांचे प्रदर्शन बंद आहे त्याचा जबर फटका टॉकीज व्यावसायिकांना बसत आहे.