खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी बळकावली
By Admin | Updated: August 22, 2016 01:50 IST2016-08-22T01:50:16+5:302016-08-22T01:50:16+5:30
खोटे कागदपत्र सादर करून अंगणवाडी सेविकेचे पद बळकावल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी बळकावली
नागभीड सीडीपीओ कार्यालयातील प्रकार : गावकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप
नागभीड : खोटे कागदपत्र सादर करून अंगणवाडी सेविकेचे पद बळकावल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मांगलीच्या नागरिकांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका म्हणून रूजू झालेल्या विना प्रशांत पालपणकर यांनी त्यांच्या लग्नाची तारीख १ मे २०१५ अशी दर्शविली असली आणि हे लग्न साकोलीच्या नवदुर्गा उत्सव मंडळात झाले असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असले तरी या लग्नाची नोंद मंडळाच्या रेकार्डवर नाही. हे लग्नच खोटे असून केवळ नोकरीच्या निमित्ताने जुळवून आणण्यात आले आहे, असा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला.
अंगणवाडी सेविकेची पदभरती ५ मे २०१६ रोजी असताना पालपणकर यांनी ४ जानेवारी २०१६ रोजी रहिवासी प्रमाणपत्राकरिता मांगली ग्रामपंचायतकडे अर्ज केला. त्यावेळी मांगली येथे कार्यरत ग्रामसेवक प्रभारी होते. त्यांना मांगलीची कोणतीही माहिती नव्हती. मात्र अर्ज केला तेव्हा १४ जानेवारी २०१६ च्या आधार कार्डची झेराक्स पुरावा म्हणून देण्यात आला. त्याचा अर्थ पालपणकर यांनी ग्रामसेवकाची दिशाभूल केली आहे. लग्नाची खोटी नोंद दर्शवून शासनाची फसवणूक केली आहे, असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
विना प्रशांत पालपणकर यांच्या निवडीवर व अर्जावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने तर एकदा त्यांना अपात्रसुद्धा म्हटले आहे. नंतर गावकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
मूल येथील गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी केली. पण पुरी यांनी ढळढळीत पुराव्यांकडे डोळेझाक करून पालपणकर यांच्या निवडीस मान्यता दिल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पालपणकर यांनी सादर केलेले मांगली येथील रहिवासी प्रमाणपत्र खोट्या स्वाक्षऱ्या करून प्राप्त केले असून सरपंच व सचिवांनी याबाबत लेखी स्वरूपात खुलासाही केला आहे.
असे असूनही चौकशी अधिकारी एस.जी. पुरी यांनी कोणती चौकशी केली, असा गावकऱ्यांचा सवाल आहे. या पत्रकार परिषदेला संजय माकोडे, पुरुषोत्तम मंगर, धर्मदास देशमुख, रवी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)