‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या
By Admin | Updated: March 19, 2015 00:52 IST2015-03-19T00:52:26+5:302015-03-19T00:52:26+5:30
सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे.

‘आता जहर खाऊ नका’ गीत परिपाठात घ्या
चंद्रपूर : सातत्याने येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कर्ज, नापिकीमुळे तो नैराश्यामध्ये आहे. यामुळे आत्महत्येसाठी जहराच्या बाटलीकडे धाव घेत आहे. या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी गावागावांतील विद्यार्थ्यांना शालेय परिपाठात ‘जहर खाऊ नका’ या गीताचा समावेश केल्यास, शेतकरी पालकांमध्ये आत्मविश्वास वाढून मुलांकडे बघून शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला आहे. त्यामुळे यासंदर्भातील निवेदन शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्याकडे देऊन या गीताचा परिपाठामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला तर, कधी सुका दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. खरीब आणि रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजार तसेच अन्य समस्यांचे निराकरण कसे करावे, या विवंचनेत आहे.
यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महतेसारखा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र निराश शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नाही.
शेतकऱ्यांना जीवन जगण्याची नवी उभारी मिळण्याच्या दृष्टीने त्यांना धीर देवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांत कवी प्रा. ज्ञानेश वाकुलकर यांचे ‘जहर खाऊ नका’ हे गीत दैनिक परिपाठात घेतली तर चिमुकल्यांनी दिलेला धीर नैराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मृत्यूंजय मंत्रासारखा वाटेल, बळीराजाला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल, असही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते जी.जी. धोटे, अध्यक्ष वेल्हेकर, सरचिटणीस जे.टी. पोटे, कार्याध्यक्ष रवींद्र इंंगळे, कोषाध्यक्ष पंढरी डाखरे, संतोष कुंटावार, किशोर उपरुंडवार, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगरप्रतिनिधी)