वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा
By Admin | Updated: December 16, 2015 01:19 IST2015-12-16T01:19:56+5:302015-12-16T01:19:56+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अर्थ व नियोजन,

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा
मुनगंटीवार यांचे निर्देश : नागपुरात पार पडली आढावा बैठक
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अर्थ व नियोजन, वन मंत्री तथा चंद्र्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्यात.
नागपूर येथील सेमिनरी हिल येथील वन सभागृहात आयोजित बैठकीत चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित विषयांचा आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, राजीव मिश्रा, डॉ. संजयकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, कक्ष अधिकारी ए. एम. डहाळे, एस.एन. योगे, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, पी. के. इंगोले, एस.एस. परांजपे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत शासकीय वैद्यकीय व रूग्णालय, चंद्रपूर येथील नवीन अभिहस्तांकीत केलेल्या २० हेक्टर जागा व जोड रस्त्यासाठी वेकोलिचे ना हरकत प्रमाणपत्र व प्रस्तावित जागेवर नवीन इमारतीच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, प्रस्तावित नवीन जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्याबाबत, क्षय रूग्णालय परिसरात पदवीपूर्व मुला-मुलींकरीता वसतीगृह इमारतीच्या कामकाजाबाबत पाठपुरावा, परीक्षागृह व विद्यार्थी खानावळीचे बांधकाम, भविष्यात बल्लारपूर येथे आंतरवासियता (इंटर्नशिप) प्रशिक्षणाकरिता, निवासस्थान व खानावळीसाठी इमारत बांधकाम, प्राणीगृह बांधकाम, महाविद्यालयातील रिक्त पदे, फर्निचर, सुरक्षा रक्षक आदीविषयांचा सविस्तर आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला.
तसेच महाविद्यालयाची कामे प्राधान्याने करण्यात येऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या. प्रास्ताविक डॉ. संजय कुमार यांनी करून विषयवार सविस्तर माहिती यावेळी सादर केली. (प्रतिनिधी)