भरारी घ्या, पण मातृसंस्कृती जपा
By Admin | Updated: February 4, 2016 01:02 IST2016-02-04T01:02:21+5:302016-02-04T01:02:21+5:30
विद्यार्थ्यांनो, आयुष्यात कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जा. देशात व परदेशात उच्चपदस्थ अधिकारी व्हा.

भरारी घ्या, पण मातृसंस्कृती जपा
भुप्ता यांचे आवाहन : बल्लारपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बल्लारपूर : विद्यार्थ्यांनो, आयुष्यात कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जा. देशात व परदेशात उच्चपदस्थ अधिकारी व्हा. वंचितांसाठी काम करण्याची मानसिकता ठेवा. यशापयशाच्या ताणतणावाच्या वेळी संयमाने वागा. समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करा, यशाची उंच भरारी घ्या. पण विद्यार्थ्यांनो मातृ संस्कृतीचे जतन करा, असे भावनिक आवाहन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नवीनचंद्र भुप्ता यांनी सोमवारी गुरुनानक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात केले.
बल्लारपूर येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात गुरुनानक दिवस व महाविद्यालय दिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ स्थानिक सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जी. वेगिनवार, उपप्राचार्य उदय काळे, संयोजक प्रा.शोभा गायकवाड (नगराळे), प्रा.अपर्णा दुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य एन.सी. भुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून व गुरुनानक देव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रा.डॉ. विजय सोरते, उपप्राचार्य उदय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान महाविद्यालयात व गोंडवाना विद्यापिठातून विज्ञान शाखेत प्रथम आलेली खुशबू शेख हिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे तृप्ती मिराणी, प्रियंका भुक्या, रुकसार अली, संजीवणी लांडे, अविष्कार २०१५ मध्ये पूर्ण येथे भाग घेतल्याबद्दल कोमल जानवे, कविता बल्लव, आकांक्षा द्विवेदी, प्रगती सूर्यवंशी, मोहनकुमार शर्मा, निशा खान, कृशकांत ओझा, वैभव मृत्यलवार, दिलीप अडवाणी, आरती त्रिपाठी, अंकिता चौधरी, कल्याणी शाहू, बिल्कीस शेख, तन्मयी बावगे, श्रेया गोयल, स्वर्णदीप चंदन आदी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.जी. वेगीनवार यांनी केले. संचालन प्रा.अर्पना दुर्गे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)