सकाळी दहाच्या आतच नववधूला घेऊन वरात परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:15+5:302021-05-06T04:30:15+5:30
प्रकाश काळे गोवरी : लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण. दोन वेगळे जीव साता जन्माच्या गाठीने एका विवाह बंधनात ...

सकाळी दहाच्या आतच नववधूला घेऊन वरात परत
प्रकाश काळे
गोवरी : लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण. दोन वेगळे जीव साता जन्माच्या गाठीने एका विवाह बंधनात बांधले जातात. मात्र, कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यावर बंधने आल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमात लग्न सोहळे पार पडत आहे.
या लग्नांमध्ये ना डीजे, ना सनईचे सूर वाजत असल्याने अगदी सध्या पद्धतीने लग्न सोहळे उरकले जात असून, लग्न लावून नवरदेव सकाळी दहाच्या आत नववधूला घेऊन आपल्या गावाकडे रवाना होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना कसलाही धोका होऊ नये म्हणून गावागावांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे दरवर्षी साजरे होतात. मात्र, मागील वर्षापासून कोरोनामुळे लग्न सोहळ्यात कुठेच सनईचे सूर अथवा बँड पथक किंवा डीजेची धूम ऐकायला मिळाली नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील तुळशीराम जूनघरी यांची कन्या प्रणालीचा विवाह शिंदोला येथील चंद्रभान काळे यांचा मुलगा हेमंतशी ठरला. लग्न धडाक्यात करू अशी इच्छा मनात असताना चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे शासनाने विवाह सोहळ्यावर बंधने आणली. २५ लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे काटेकोर पालन करून मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत प्रणाली ऊर्फ भावना व हेमंतचा विवाह अगदी साध्या पद्धतीने नुकताच पार पडला. सकाळीच आठ वाजता लग्न लावून नवरदेव आपल्या नववधूसह १० वाजण्याच्या आत आपल्या स्वगावी परतत आहे. कधीकाळी १२ वाजता लग्नासाठी घरून निघणारा नवरदेव आता चक्क सकाळी १० वाजता लग्न लावून मोकळा होत आहे.
बॉक्स
कोरोनामुळे सर्वच व्यवसाय संकटात
ग्रामीण भागात शेतीची कामे उरकल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसोहळ्याला सुरुवात होते. मात्र, कोरोना संसर्गाने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. लॉकडाऊन झाल्याने अनेकांचा व्यवसाय बुडाला आहे, तर लग्न सोहळा संबंधित बँड पथक, डीजे, डेकोरेशनवाले, लग्न सजावट, फोटो स्टुडिओ व या संबंधित सर्वांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत.