मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 01:12 IST2016-03-17T01:12:26+5:302016-03-17T01:12:26+5:30
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घ्या
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : शासनाची महत्त्वाकांक्षी योजना
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यामध्ये १९६३ शेततळयांचे लक्षाक देण्यात असून यामध्ये चंद्रपूर-१४०, बल्लारपूर-१३९, मूल-१३९, सावली-१४०, वरोरा-१६५, भद्रावती-१६५, चिमूर-१६५, राजूरा-१४०, कोरपना-१४०, जिवती-५०, गोंडपिपरी-१४०, पोंभूर्णा-१४०, नागभीड-१००, सिंदेवाही-१०० व ब्रह्मपुरी-१०० तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याने या संधीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकूण १३ आकारमानाच्या प्रकारात शेततळे घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन आहे ते व त्यावरील जमीन असलेले शेतकरीसुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेमधून लाभ घेतलेला नसावा.
दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्राधान्याने निवड करण्यात येईल. सदर योजना ही मागील पाच वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेनुसार देय होणारी अनुदानाची कमाल रक्कम रुपये ५० हजार इतकी राहील. रुपये ५० हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याला स्वत: खर्च करावी लागणार आहे.
लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ फेब्रुवारी पासून सुरु झालेली असून इच्छुक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज तथा संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्याची मागणी आॅनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे भरावयाची आहे.
संकेतस्थळावर अर्जाचा नमुना लाभार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावेत. प्रपत्र-२ मध्ये नमुद केलेली माहिती जमा करुन मुळ अर्ज भरुन लाभार्थ्यांने स्वत:च्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे इत्यादीसह स्कॅन करुन ठेवावे. आॅनलाईन पध्दतीद्वारे या संकेतस्थळावर अर्जाची माहिती आॅनलाईन भरुन अर्जात नमुद केलेली जोडपत्रे स्कॅन कॉपी जोडून अपलोड करावी.
आॅनलाईन अर्जाची पोहोच पावती इच्छुक लाभार्थ्यांनी डाऊनलोड करुन स्वत:कडे ठेवावे. या योजने अर्ज करणाऱ्या व्यक्तिने आपले सरकार संकतेस्थळावर जाऊन मागेल त्याला शेततळे या लिंक वर अर्ज भरता येणार आहे.
सदर योनजेत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)