सामूहिक योगासनाचा लाभ घेणार
By Admin | Updated: June 21, 2017 00:41 IST2017-06-21T00:41:31+5:302017-06-21T00:41:31+5:30
जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, शिक्षण विभाग....

सामूहिक योगासनाचा लाभ घेणार
स्वच्छता अभियान : जिल्हा स्टेडियमवर शासकीय आयोजन
चंद्रपूर : जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, शिक्षण विभाग आदींच्या संयुक्त आयोजनातून बुधवारी सकाळी ७ वाजतापासून स्थानिक जिल्हा स्टेडियम येथे सामूहिक योगाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. आरोग्य चांगले राहण्यासाठी हजारों नागरिक या सामूहिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याची पूर्वतयारी करण्यात आली असून मंगळवारी सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गेल्या वर्षीपासून जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. शहरात देखील दोन वर्षांपासून योग दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय पातळीवर जिल्हा स्टेडियमच्या मैदानावर योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पतंजली योग समितीतर्फे उपस्थित नागरिकांना योगाभ्यास करण्यात येणार आहे. पतंजली समितीचे ऋषिपाल गहलोत योगासनांचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याकरिता स्टेडियमच्या मैदानावर गाद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंचावरून नागरिकांना आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना योगासने करण्यासाठी स्वत: चटईची व्यवस्था करावी लागणार आहे.
जिल्हा स्टेडियमवरील कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मंगळवारी जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता रॅली काढण्यात आली. त्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, शिक्षणाधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आदींचे कर्मचारी व स्वयंसेवक सहभागी झाली. या कर्मचारी व स्वयंसेवकांनी जिल्हा स्टेडियमचे मैदान व क्रीडा संकूल स्वच्छ केले. कार्यक्रमादरम्यान पाऊस आला तर गोंधळ व्हायला नको, ही दक्षता घेऊन स्टेडियमवरील सभागृहही सज्ज ठेवण्यात आले आहे. या सभागृहाचीही स्वच्छता करण्यात आली. यावेळी पतंजली योग समितीचे गोपाल मुंदडा, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) साधना केकतपुरे, शिक्षण विस्तार अधिकारी जी. एन. चांदेकर, मनीषा मानकर आदींसह अनेक जण उपस्थित होते.
एसटी वाहकांची चुप्पी
योग दिनासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींना निमंत्रण
जिल्हा स्टेडियम येथील बुधवारच्या जागतिक योग दिन कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी व सदस्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. या व्हीआयपींसाठी आणि अधिकारी वर्गासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विविध ठिकाणी आयोजन
जागतिक योग दिनाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली योग समिती, नवजीवन योग मंडळ, हास्य क्लबतर्फे श्री. कन्यका परमेश्वरी देवस्थान सभागृहात पहाटे ५ वाजतापासून रात्री ७ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गांधी चौक येथे श्री. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, श्री. गुरूमाऊली गंगामाई योग शिक्षण केंद्र, आर्ट आॅफ लिव्हिंग, आरोग्य भारती, श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ६ ते ८ वाजता सामूहिक योगासने सादर करण्यात येतील. घुग्गुस येथे पतंजली योग समिती व घुग्घुस पोलीस स्टेशनतर्फे स्नेह प्रभा मंगल कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता योग प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.