भंडाऱ्याच्या ‘त्या’ आमदारावर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 00:46 IST2016-08-31T00:46:38+5:302016-08-31T00:46:38+5:30
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी भंडाराच्या आमदाराने दारुच्या नशेत असलेल्या वाहन ...

भंडाऱ्याच्या ‘त्या’ आमदारावर कारवाई करा!
निलंबनाची मागणी : पोलीस बाईजचे निवेदन
चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयोजित तिरंगा रॅलीप्रसंगी भंडाराच्या आमदाराने दारुच्या नशेत असलेल्या वाहन चालकावर कारवाई करणाऱ्या तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गालावर थापड मारण्याची लांछनास्पद कृती केली. त्या आमदारावर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी पोलीस बाईज असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या हुतात्मा स्मारकाजवळ मंच उभारुन तिरंगा रॅली व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भंडारा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रामचंद्र अवसरे यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. आमदाराचे भाषण सुरु असताना आमदारांचा वाहनचालक दारुच्या नशेत भाषणाचे चित्रिकरण करीत होता. चित्रिकरण करताना तो वारंवार रस्त्यावर येत होता. त्यामुळे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राजू साठवणे यांनी त्यास रस्त्याच्या कडेला उभे राहून चित्रिकरण करण्याबाबत समजावून सांगितले. परंतु त्याने आमदाराचा वाहनचालक असल्याचा आव आणून पोलीस शिपायाशी उद्धट बोलून चित्रिकरण सुरु ठेवले.
भाषणाचा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार आपल्या वाहनाजवळ गेले असता त्यांना वाहन चालकास पोलीस ठाण्यात नेल्याचे समजले. त्यामुळे रागाने त्यांनी पोलीस शिपाई राजू साठवणे यांच्या गालावर थापड मारली. या घटनेमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचणे स्वाभाविक आहे. अशा घटनांवर भविष्यात अंकुश लागावा, याकरिता संबंधित आमदारावर कारवाई करून त्यास निलंबित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी आशुतोष सलील यांना सादर केले. (प्रतिनिधी)