मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करा
By Admin | Updated: September 6, 2016 00:41 IST2016-09-06T00:41:57+5:302016-09-06T00:41:57+5:30
शहरातील महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात एका प्राध्यापकाने कॅमेरा लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुलींच्या स्वच्छतागृहात कॅमेरा लावणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करा
शिवसेनेची मागणी : व्यवस्थापनाची नाममात्र कारवाई
वरोरा : शहरातील महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात एका प्राध्यापकाने कॅमेरा लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवस्थापनाने नाममात्र कारवाई केली. हा प्रकार घृणास्पद असल्याने या प्राध्यापकावर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने वरोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली.
वरोरा शहरातील आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने मुलींच्या स्वच्छता गृहात छुपा कॅमेरा लावण्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सदर प्राध्यापकाचा हा लांछनास्पद प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. कॅमेऱ्यामध्ये अनेक महाविद्यालयीन युवतींचे छायाचित्र असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. सदर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने या प्राध्यापकावर नाममात्र कारवाई केली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे आणि फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिवसेनेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कामगार सेना प्रमुख मनोज दानव, नगरसेवक राजू महाजन, राहुल ढेंगणे, दिनेश यादव, बंडू देऊळकर, त्रिसन रासेकर, प्रफुल्ल नामे, बंटी चौधरी, आशिष रुयारकर, सन्नी गुप्ता, पंकज माधव, अक्षय रासेकर, भुवनेश्वर मेश्राम, सलीम शेख आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
प्राध्यापकाला निलंबित
करा; भाजपही मैदानात
मुलींच्या स्वच्छतागृहात स्वत: प्राध्यापकाने पेन कॅमेरा लावला. हा प्रकार महाविद्यालयीन युवतीच्या लक्षात आल्यानंतर तो कॅमेरा प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्राध्यापकाला निलंबित करा अथवा राजीनामा द्यावा लागला असला तरी घडलेला प्रकार निंदनीय आहे. विद्यार्थ्यांसोबत पवित्र नाते समाजाला अभिप्रेत आहे. शाळा महाविद्यालय शिक्षणाकरिता आपल्या पाल्याला पालक पवित्र मंदिर म्हणून पाठवित असतात शिक्षकाच्या हाती मुलांचे भविष्य व जडणघडण असते. त्यात असा प्रकार घडल्यास समाजात त्याचा विपरित परिणाम होत असतो सदर प्रकार निंदनीय व घृणास्पद आहे. हे कृत्य करणाऱ्या प्राध्यापकावर कठोर कारवाई गरजेचे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
उद्या महाविद्यालय बंद
शिवसेना वरोरा शहराच्या वतीने ‘त्या’ प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर बुधवार ७ सप्टेंबर रोजी महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा शिवसेना वरोरा शहर प्रमुख नीलेश भालेराव यांनी दिला आहे.