बेजबाबदार ग्राम सचिवावर कारवाई करा
By Admin | Updated: December 27, 2015 01:29 IST2015-12-27T01:29:52+5:302015-12-27T01:29:52+5:30
तालुक्यातील चेकबरांज या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कारकिर्दीत सचिव पदावर असताना एम.एस. येवले यांनी गाव नमूना आठ तयार करताना नियमाला धाब्यावर बसविले.

बेजबाबदार ग्राम सचिवावर कारवाई करा
मागणी : पिपरबोडीचे अपूर्ण रेकॉर्ड माहिती प्रकरण
भद्रावती : तालुक्यातील चेकबरांज या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कारकिर्दीत सचिव पदावर असताना एम.एस. येवले यांनी गाव नमूना आठ तयार करताना नियमाला धाब्यावर बसविले. त्यामुळे गावातील अनेक भूधारक व मालमत्ताधारकांचे नुकसान झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याने सचिवाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य शंकर अण्णा कोलनेडी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चेकबरांज ग्रामपंचायतीमध्ये नवीन पिपरबोडी हा भाग आयुध निर्माणी वसाहतीला लागून आहे. गेल्या २५ वर्षांपासून या भागात अनेक कुटुंब घर बांधून वास्तव्याला आहेत. हा भाग बरांज येथील कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीसाठी संपादित करण्यात आला होता. या गावाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला नसल्याने ही जागा शेतजमीन या नावाने नोंदविल्याने त्या ठिकाणच्या कुटुंबीयांना अत्यल्प मोबदला मिळाला. परंतु गावकऱ्यांनी या मोबदल्याच्या विरोधात आवाज उठविला. ग्रामपंचायत सदस्य शंकर अण्णा कोलनेडी यांनी या भागाचा संपूर्ण रेकॉर्ड माहितीच्या अधिकाराद्वारे मागविला असता धक्कादायक बाब सामोर आली. यात एम.एस. येवले हे १ आॅगस्ट १९९९ ते २८ सप्टेंबर २००० या काळात येथे कार्यरत होते. तसेच त्यानंतर े१९ आॅगस्ट २००७ ते सन २०११ व सन २०१३ ते २०१४ या काळात सुद्धा कार्यरत होते. त्यांनी नवीन पिपरबोर्डीचा रेकार्ड तयार करताना गाव नमुना ८ हा नियमाला धरुन बनविला नाही. प्रमाणित रेकॉर्डसाठी ग्रामसेवक सरपंच, विस्तार अधिकारी आणि संवर्ग विकास अधिकारी या चारही जणांचे सही, शिक्क्याने प्रमाणित केली पाहिजे. तरच तो रेकॉर्ड प्रमाणित मानल्या जातो. गाव नमुना ८ हा दर चार वर्षाने बनविला जातो. सन २००० ते २००१ या काळात कार्यरत ग्रामसेवक व्ही.आर. भिवगडे यांनी चारही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने रेकॉर्ड प्रमाणित केला होता. परंतु येवले यांनी सरपंच आणि सचिव या दोघांच्या सही शिक्क्याने रेकॉर्ड तयार केला. त्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)