ग्रेस व सिद्धबली कंपनीवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:54+5:302021-04-27T04:28:54+5:30
भद्रावती : ताडाळी येथील ग्रेस आणी सिद्धबली कंपनीकडून कामगारांचे शोषण केले जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई ...

ग्रेस व सिद्धबली कंपनीवर कारवाई करा
भद्रावती : ताडाळी येथील ग्रेस आणी सिद्धबली कंपनीकडून कामगारांचे शोषण केले जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. यासंदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी कामगार नेते विशाल दुधे यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे निवेदनातून केली आहे; अन्यथा कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून व्यवस्थापनाद्वारे कंपनीमधील कामगारांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण करीत आहेत. एकीकडे देशात कोरोनाची महामारी चालू असताना कंपनीमधे प्रदूषणाची आणि कामगारांना मिळणाऱ्या मूलभूत सोईसुविधा तथा किमान वेतन अशा समस्यांची महामारी चालू आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून स्थानिक कामगार आपल्या मागणीसाठी ग्रेस कंपनी प्रशासन, कामगार आयुक्त, प्रदूषण निंयत्रण मंडळ यांच्याविरुद्ध लढा देत आहे. कंपनीविरुद्ध कारवाईसाठी संबंधित प्रशासन चूप का आहे, असा सवाल कामगारांमध्ये सर्वांत चिंतेचा विषय ठरला आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये या समस्यांविरुद्ध कामगारांनी कंपनी बंद करण्याचा प्रयत्न करून लढा दिला होता, परंतु कामगार पुढारी ४० कामगारांना कंपनी सेवेमधून अग्रवाल यांच्या सांगण्यावरून बरखास्त केले आणि कंपनीमध्ये भीतीचे वातावरण तयार केले. कंपनी मालकाने ग्रेस कंपनीमध्ये कामगारांचे शोषण करून आणि शासन व्यवस्थेच्या नियमाला मोडून नुकताच ६०० कोटींमध्ये विकत घेतलेला सिद्धबली प्लांटमध्येसुद्धा ग्रेससारखी अन्यायकारी व्यवस्था राबवली जात असल्याचा आरोप कामगार नेता दुधे यांनी या निवेदनातून केला आहे. यावेळी दोन्ही प्लांटमधील कामगार उपस्थित होते.