तलाठ्याच्या निलंबनासाठी तहसीलदार सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:55 IST2018-09-10T22:55:23+5:302018-09-10T22:55:43+5:30
अॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

तलाठ्याच्या निलंबनासाठी तहसीलदार सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : अॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
तलाठी अविनाश दुर्योधन यांनी शासकीय कामात हलगर्जी केल्याने तहसीलदार सचिन गोसावी यांनी वार्षिक वेतनवाढ रोखली. ही कार्यवाही शासकीय नियमानुसारच करण्यात आली, असा दावा तहसीलदार संघटनेने निवेदनात केला. दुर्योधन यांनी शासनाच्या सातबारा संगणीकृत कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी अपिल दाखल करायला हवे होते. मात्र कारवाई होऊ नये, यासाठी अॅट्रासिटी कायद्याचा दबावतंत्र म्हणून वापर करीत आहेत, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत ठेवले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता यांचे मत मागितल्याचेही ते म्हणाले. दुर्योधन यांना तत्काळ निलंबित करावे, गोसावी यांच्याविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात येवू नये, अशी मागणी केली. यावेळी सावलीचे तहसीलदार उषा चौधरी, रवींद्र होळी, समीर माने, विकास अहीर, पल्लवी टेमकर, सचिन गोसावी आदी उपस्थित होते.