ताडोबा एक्स्प्रेसमुळे रेल्वे सुविधा वृद्धिंगत होण्यास मदत
By Admin | Updated: August 9, 2016 00:45 IST2016-08-09T00:45:07+5:302016-08-09T00:45:07+5:30
काझीपेठ - मुंबई या नव्या ‘ताडोबा एक्सप्रेस’ चा ८ आॅगस्टपासून शुभारंभ झाला. या ताडोबा एक्सप्रेसमुळे महाराष्ट्र...

ताडोबा एक्स्प्रेसमुळे रेल्वे सुविधा वृद्धिंगत होण्यास मदत
हंसराज अहीर : आनंदवन व ताडोबा एक्सप्रेस पाठपुराव्याचे फलित
चंद्रपूर : काझीपेठ - मुंबई या नव्या ‘ताडोबा एक्सप्रेस’ चा ८ आॅगस्टपासून शुभारंभ झाला. या ताडोबा एक्सप्रेसमुळे महाराष्ट्र व तेलंगना राज्यातील रेल्वे सुविधा वृध्दींगत होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली.
क्षेत्रातील लोकांना मुंबईला थेट जाण्यासाठी आणखी एक विकल्प मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाठपुरावा केला. काही महिन्याअगोदर सुरु झालेली आनंदवन एक्स्प्रेस व आता ताडोबा एक्स्प्रेस, हे त्यांच्या पाठपुराव्याचे फलित आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रातील व्यक्ती व राष्ट्रीय उद्यानाचा गौरव सर्वदूर व्हावा या दृष्टिकोनातून आनंदवन व ताडोबा एक्सप्रेसचे नाव ना. अहीर यांनी या रेल्वेला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या प्रत्येक मागणीचा सकारात्मकतेने विचार केला आहे. त्याचीच एक पावती म्हणजे या नव्याने सुरु झालेली आनंदवन व ताडोबा एक्स्प्रेस आहे, असेही ना. अहीर यांनी स्पष्ट केले.
भाजपप्रणित सरकार स्थापन झाल्यानंतर रेल्वे विभागात अनेक अशा सोई-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अनेक नव्या रेल्वेगाड्यांची सुरुवात करीत देशाच्या सेवेत समर्पित करण्यात आल्या आहेत. रेल्वे सुविधांमध्ये एका नव्या अध्यायाची ही सुरुवात असून यातून रेल्वे प्रवाशांना योग्य त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. या रेल्वे मुळे मार्गावरील अनेक प्रवाशांना न्याय मिळेल, असे प्रतिपादनही यावेळी ना. अहीर यांनी केले. या नवीन काझीपेठ - मुंबई एक्स्प्रेसमुळे जनतेला मुंबईकडे जाण्यास तसेच दक्षिण भारत जाण्यास सोय उपलब्ध होणार असून दोन्ही राज्यातील रेल्वे सुविधा वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे हंसराज अहीर यांनी सांगितले. मुंबई येथे क्षेत्रातील अनेक व्यवसायी, विद्यार्थी व पर्यटक जात-येत असतात. त्यांच्या सुविधेत वाढ करण्याच्या अनुषंगाने या ताडोबा एक्सप्रेसची सुरुवात करण्यात आली आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.सिकंदराबाद येथे या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रेल्वेची सुरुवात करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)