सुवर्णमहोत्सवी सोमनाथ श्रम संस्कार छावणीस आजपासून प्रारंभ
By Admin | Updated: May 15, 2017 00:51 IST2017-05-15T00:51:43+5:302017-05-15T00:51:43+5:30
थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी ५० वर्षांपूर्वी सोमनाथ येथे सुरू केलेल्या श्रम संस्कार छावणीस १५ ते २२ मे दरम्यान सुरूवात होत आहे.

सुवर्णमहोत्सवी सोमनाथ श्रम संस्कार छावणीस आजपासून प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा : थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी ५० वर्षांपूर्वी सोमनाथ येथे सुरू केलेल्या श्रम संस्कार छावणीस १५ ते २२ मे दरम्यान सुरूवात होत आहे. उद्यापासून सुरू होणारी छावणी सुवर्ण महोत्सवी असल्याने इतिहासाला उजाळा देणारी ठरणार आहे.
१५ मे रोजी सुरू होणाऱ्या या छावणीस पूर्ण दिवस डॉ. विकास आमटे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरूवात होणार आहे. याशिवाय आनंदवन ते प्रयोगवन या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय आनंदवनची वाटचाल या विषयावर डॉ. कौस्तुक आमटे हे माहिती देणार आहे. डॉ. शितल आमटे, गौतम करजगी, डॉ. पल्लवी आमटे व डॉ. कौस्तुक आमटे यांचे संयोजन लाभलेल्या या छावणीस वेगळे महत्त्व असणार आहे.
शिबिर प्रमुख रवींद्र नलगिंटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व बंगलोर, दिल्ली, सुरत, हैदराबाद, जयपूर आदी ठिकाणाहून ५०३ शिबिरार्थी सहभागी होत असून वयोगट १८ ते ४५ च्या ३२५ पुरुष व १७८ स्त्रियांचा समावेश राहील. विशेष बाब म्हणजे बाबांच्या काळातील अनेक समाजसेवी कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. नवोपक्रम म्हणून जपानी पद्धतीने वनीकरणाचे प्रशिक्षण येत्या ७ दिवसात शिबिरार्थींना दिले जाईल. याशिवाय शिबिराचे स्मरण राहावे म्हणून एक दगडी भिंत उभारली जाणार व त्यावर शिबिरार्थीचे मनोगत कोरले जाईल. सकाळी ४ ते रात्री १०.३० पर्यंत शिबिराचा कालावधी असेल. सर्च गडचिरोलीचे योगेश कालकुंडे, मुक्ता अवचट (पुणतांबेकर) अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व डॉ. विकास आमटे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी शिबिरार्थींना मिळणार अससल्याचे शिबिर प्रमुख नलगिंटवार यांनी सांगितले. सोमनाथचे कार्यकर्ते अरुण कदम, हरिभाऊ बडे आदी व्यवस्थेत मग्न राहतील.