कोलगाव येथील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: May 13, 2016 01:01 IST2016-05-13T01:01:38+5:302016-05-13T01:01:38+5:30
राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील शिक्षकाचे २० एप्रिलला मोठ्या थाटामाटात लग्न झाले.

कोलगाव येथील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू
२० एप्रिलला झाले होते लग्न : विसापूर टोलनाक्या जवळील घटना
बल्लारपूर : राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील शिक्षकाचे २० एप्रिलला मोठ्या थाटामाटात लग्न झाले. भावी जीवनाचे स्वप्न रंगविले जात असतानाच त्या नवविवाहीत शिक्षकाचा संशयास्पद स्थितीत गळफास घेतलेला मृतदेह बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गालगत विसापूर टोल नाक्याजवळ रस्त्यापासून २०० फुटाच्या अंतरावर आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
जयंत जगन्नाथ बोढाले (३०) असे मृताचे नाव असून तो राजुरा तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी आहे. हिंगोली जिल्ह्यातील मारोडा येथील जिल्हा परिषद शाळेत तो शिक्षक म्हणून कार्यरत होता.
जयंत बोढाले याचे लग्न राजुरा येथील एका मुलीशी २० एप्रिल रोजी झाले होते. लग्नाचा सोपस्कार पार पडल्यानंतर तो कार्यरत ठिकाणी गेला होता. दरम्यान १ मे रोजी राजुरा येथे सासुरवाडीला आला. तद्नंतर पत्नीसोबत कोलगाव येथे वडिलाकडे राहावयास आला. गुरुवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान त्याला मोबाईलवर एक कॉल आला. त्यावेळी जयंतने १० मिनीटात घरी येतो, असे घरच्यांना सांगुन बाहेर तो पडला. मात्र दोन-तीन तासांचा कालावधी होऊनही तो घरी परतला नाही.
नवविवाहीत पत्नीसह घरची मंडळी चिंताग्रस्त झाली. जयंतचा भाऊ प्रविण बोढाले यांनी लगतच्या कढोली व राजुरा येथे जाऊन शोध घेतला. मात्र त्या ठिकाणीही जयंत आढळून आला नाही. दरम्यान प्रविण बोढाले हा मावसभावाला सोबत घेवून चंद्रपूरकडे जात असताना विसापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी दिसल्याने ते थांबले. रस्त्याच्या बाजुला २०० फूट आत अंतरावर सागाच्या झाडाच्या फांदीला नायलॉन दोराने गळफास घेतलेल्या स्थितीत जयंतचा मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याला देण्यात आली.
घटनास्थळाचे अवलोकन केला असता, जयंतचा अन्य ठिकाणी खून करून गळफास घेतल्याचा केवळ देखावा निर्माण करण्यात आल्याची चर्चा केली जात होती. गळफास घेतल्यावर त्याची स्थिती दोन्ही पाय मागे वळून गुडग्यावर बसल्यागत होती. त्याची पादत्राणे जवळच होती. मात्र त्याच्याजवळी मोबाईल बेपत्ता होता. घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेचे गूढ उकलणार आहे. (शहर प्रतिनिधी)