भाजप पक्षाला साथ द्या, गोंडपिंपरीला स्मार्ट सिटी बनवू
By Admin | Updated: January 9, 2016 01:28 IST2016-01-09T01:28:27+5:302016-01-09T01:28:27+5:30
येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास ...

भाजप पक्षाला साथ द्या, गोंडपिंपरीला स्मार्ट सिटी बनवू
सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : गोंडपिंपरीत जाहीर सभा
गोंडपिंपरी : येत्या १० जानेवारीस गोंडपिंपरी नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत गोंडपिंपरी वासियांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास शहराला स्मार्ट सिटी बनवू सोबतच पहिल्याच टप्प्यात १० कोटींचा विकास निधी देवून संपूर्ण राज्यात पोंभूर्ण्यासह गोंडपिंपरी नगरपंचायतीला आदर्श नगरपंचायत करु, असे आश्वासन राज्याचे अर्थ, नियोजन, वने तथा जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने राजुरा क्षेत्र आमदार अॅड. संजय धोटे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, देवराव भोंगळे, राहुल सराफ, हरिश शर्मा, राजू घरोटे, प्रमोद कडू, सतीश धोटे, सुरेश धोटे, बबन निकोडे, दीपक बोनगीरवार, सुहास माडूरवार, नरेंद्र इंगोले तथा पक्षातर्फे १७ ही प्रभागात उभे असलेले उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते.
शहराच्या विकासाबाबत बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, गोंडपिंपरी शहरवासीयांचा मी ऋणी असून शहरातील मुलभूत गरजांपैकी रस्ते, नाली, वीज, पाणी, घरकूल आदी सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणार. त्याचबरोबरच दारिद्रय रेषेखालील भूमीहिनांना ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य करुन त्या जागेवर घरकुलांची उभारणी होण्यासाठी शासनाने नुकतेच निर्णय घेतले आहेत. तसेच जिल्ह्यातील दारुबंदीबाबत बोलताना ते म्हणाले, रात्र आहे तर रावणही आहे. दारुबंदी केल्यापासून जिल्ह्यातील गुन्ह्यात घट झाली असून अपघातही कमी झाले आहे. तर दारुबंदी जिल्ह्यात काही लाचखोर व दृष्ट प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अवैध विक्रीस चालना दिल्यामुळे विषारी व बनावट दारुची आयात होत असून आगामी काळात दारुबंदीची शिस्त घालण्यासाठी आपण महिल्यांच्या समित्या नेमणार असून दारु विक्रीला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर करणार नाही, असे म्हणत पोलीस विभागाच्याही कानपिचक्या घेतल्या.
तर क्षेत्र आमदार अॅड. संजय धोटे यांनी भाजपा उमेदवारांंना स्पष्ट बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव बबन निकोडे, संचालन अमोल कडूकर तर आभार रविंद्र पावडे यांनी मानले. कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)