उपअभियंत्याचा दोन शासकीय निवासस्थानांवर ताबा
By Admin | Updated: March 27, 2015 00:53 IST2015-03-27T00:53:22+5:302015-03-27T00:53:22+5:30
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंता एस.सी. तव्वर यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.

उपअभियंत्याचा दोन शासकीय निवासस्थानांवर ताबा
वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंता एस.सी. तव्वर यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. तव्वर यांचे गोंडपिपरी येथील मुख्यालयासह चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानावरही ताबा आहे. एकाच अधिकाऱ्याला दोन शासकीय निवासस्थाने दिलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयात पाळलेले ‘मौन’ संशय निर्माण करणारे आहे. यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही उपअभियंता तंव्वर यांना ‘अभय’ असल्याची बाब स्पष्ट होत आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उपअभियंता तव्वर हे गोंडपिपरी उपविभागाला उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी त्यांचे चंद्रपूर येथे सहकुटुंब वास्तव्य होते. सध्या ते नागपुरात वास्तव्याला आहेत. प्राप्त माहितीनुसार, एस.सी. तव्वर हे चंद्रपुरात कार्यरत असताना त्यांना वास्तव्याच्या सोयीसाठी शासकीय निवासस्थान देण्यात आले. मात्र त्यांची चंद्रपूर येथून गोंडपिपरी येथे बदली झाली. गोंडपिपरी येथे रूजू होवून तव्वर यांनी येथील निवासस्थानाचा ताबा घेतला. तव्वर यांचे सद्याचे मुख्यालय गोंडपिपरी हे असल्याने गोंडपिपरी येथील निवासस्थानावरील ताबा हा अधिकृत असला तरी त्यांचा चंद्रपूर येथील शासकीय निवासस्थानावरील ताबा हा गैरकायदेशीर असल्याबाबतची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
एकाच उपअभियंत्याने तब्बल वेगवेगळ्या दोन निवासस्थानांवर ताबा मिळविल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाअभावी किरायाने रहावे लागत असून दोन निवासस्थानांचा ताबा घेणारे तव्वर हे दोन्ही निवासस्थानात केवळ एक ते दोन दिवस राहून उर्वरित दिवस नागपूर येथे घालवित असल्याची माहिती आहे.
एकीकडे तालुक्यात तव्वर यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरू असताना दोन निवासस्थानांवरील ताब्यामुळे तव्वर यांचा हा प्रताप नागरिकांना आश्चर्यात टाकणारा असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.