चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विस्तारित प्रकल्पाविरोधात आमरण उपोषणाला बसलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर यांनी सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये मंगळवारी उपोषण सोडले. चंद्रपूर वीज केंद्रात चार टन लोखंड चोरी, तसेच विस्तारीत प्रकल्पात कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकून पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियता राजू बुरडे, विस्तारीत प्रकल्पाचे मुख्य अभियंता वसंत खोकले आणि कोराडी वीज प्रकल्पातील स्थापत्याचे मुख्य अभियंता नाफळे यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आदी माणग्यांसाठी दहेगावकर यांनी ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान सुनील दहेगावकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी १४ सप्टेंबरच्या रात्री सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अतिदक्षता विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी रुग्णालयामध्येही उपोषण सुरूच ठेवले.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापनाने मे. तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्यावर सहा महिन्याकरीता निविदेमध्ये सहभाग न घेण्याकरीता बंदी घातली. ही माहिती घेऊन रुग्णालयात आलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रतिनिधीला ही कारवाई मान्य नाही, असे सांगत परत पाठविले. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून आमरण उपोषणाची सांगता केली. परंतु, आचारसंहिता संपताच लढा सुरू ठेवू, कंत्राटदाराला पाठबळ देणाऱ्या विद्युत केंद्राच्या विरोधात पुन्हा आंदोलन करून मोठा भ्रष्टाचार बाहेर काढू असे दहेगावकर यांनी म्हटले आहे. उपोषण सोडताना डी. के. आरीकर, विजय राऊत, डॉ. भगत, रवी भोयर, नितीन भटारकर, बबनराव फुंड, राजेश माकोडे, विशाल चहारे, डॉ. देव कन्नाके, अमोल ठाकरे, सनी येरणे, नितीश जाधव, राहुल तपासे, सतीश जाधव, विवेक घटे, मोहिते येरणे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सुनील दहेगावकर यांचे उपोषण सुटले
By admin | Updated: September 17, 2014 23:42 IST