रविवारी सलून बंद, नाभिक समाजाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:38+5:302021-07-21T04:19:38+5:30
राजेश बारसागडे सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी परिसरातील ४२ गावांतील नाभिक समाज बांधवांना त्यांचे सलून रविवारी उघडण्याची मुभा द्यावी, ...

रविवारी सलून बंद, नाभिक समाजाचे मोठे नुकसान
राजेश बारसागडे
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी परिसरातील ४२ गावांतील नाभिक समाज बांधवांना त्यांचे सलून रविवारी उघडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी तळोधी येथील नाभिक युवा शक्ती सर्व समावेशक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रत्येक लॉकडाऊन काळात नाभिक समाजाचे सलून बंद पाडण्याची परंपराच शासनाने आखली आहे. त्यामुळे समाजातील जवळपास २० लोकांनी व्यवसाय बुडाल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. नाभिक समाजातील विविध संघटनांनी त्यांच्या मागण्या घेऊन शासनाला आजपर्यंत अनेक निवेदने दिली. उपोषणे केली. मात्र, शासनाने नाभिक समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत नाभिक समाजाला कुठल्याही मदतीविना वंचित ठेवले. त्यामुळे नाभिक समाजाची आर्थिक स्थिती पूर्णत: खालावलेली आहे. आजही राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंतच दुकाने सुरू आहेत. मात्र शनिवार, रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. रविवार हा दिवस सलून धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान रविवारी नाभिक समाज बांधवांना सलून सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कोट
तळोधी, सावरगाव, वाढोणा आदी गावांतील काही सलूनधारक रविवारीही सलून सुरू ठेवतात. त्यांना कोणी काहीही म्हणत नाही. मात्र, आम्ही पदाधिकाऱ्यांनी सलून उघडले की बंद पाडल्या जाते. त्यामुळे रविवारी सलून उघडण्याची शासनाने परवानगी द्यावी.
-राहुल खडसिंगे,
अध्यक्ष, नाभिक युवाशक्ती सर्वसमावेशक संघटना.