The Sunday Market is not closed | संडे मार्केटचा तिढा सुटेना
संडे मार्केटचा तिढा सुटेना

ठळक मुद्देमार्केट अजूनही रस्त्यावरच : नागरिकांना अकारण त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील गांधी चौकापासून जयंत टॉकीज चौकापर्यंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्यावर दर रविवारी संडे बाजार भरतो. या बाजारात प्रचंड गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब हेरून मनपाने हा बाजार इतरत्र हलविण्याच्या हालचाली केल्या. मात्र व्यावसायिकांना ते मान्य नाही. त्यामुळे हा तिढा आजही कायम आहे.
दरम्यान, आज रविवारी महानगरपालिका प्रशासनाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत या जागेवर व्यावसायिकांना बसू दिले नाही. मात्र सायंकाळनंतर पुन्हा व्यावसायिकांना आपले मार्केट सुरू केले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात, फुटपाथवर या फेरीवाल्यांनी आपले छोटेखानी दुकान थाटले आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरीवाले रस्त्यावर असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडतो. त्यामुळे फेरीवाल्यांसाठी शहरात काही ठिकाणी वेगळे झोन करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. या झोनमध्ये कार्यरत सर्व फेरीवाल्यांना स्वतंत्र ओळखपत्रही देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची नोंदणी करणे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगानेच महानगरपालिकेने फेरीवाला नोंदणीकरण अभियान सुरू केले होते. प्रारंभी फेरीवाल्यांनी याला प्रतिसाद न दिल्याने हे नोंदणीकरण पूर्ण होण्यास विलंब झाला. या सर्वेक्षणात फेरीवाल्यांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक करणे आवश्यक आहे. मात्र वारंवर सांगूनही फेरीवाले आपला आधारकार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक करीत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. उल्लेखनीय असे की २००९ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण निश्चित केले आहे. फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांच्यासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश सर्व महानगरपालिकांना देण्यात आले होते. मात्र तेव्हा या आदेशाची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही फेरीवाल्यांना ओळखपत्र मिळाले नाही.

पर्यायी जागा व्यावसायिकांना मान्य नाही
अशातच मागील काही महिन्यांपासून गांधी चौकापासून जयंत टॉकीज चौकापर्यंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्यावर दर रविवारी संडे बाजार भरतो. कपडे, चप्पल-जोडे, ड्रेस मटेरियल यासारख्या अनेक वस्तूंची दुकाने या बाजारात असते. येथील वस्तूंचे दर दुकानाच्या तुलनेत कमी असल्याने नागरिक या बाजाराकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे दिवसभर या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. रस्त्यावरच हा बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा इतर नागरिकांना प्रचंड त्रास होतो. याबाबत काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मनपाने हा बाजार इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. या संदर्भात व्यावसायिकांना मनपाने नोटीसही बजावल्या होत्या. मात्र मनपा बाजारासाठी जी जागा सूचवित आहे, ती जागा अडगळीत असल्याने व्यावसायिक त्या जागेवर जायला तयार नाही. त्यामुळे प्रश्न सुटला नाही.

Web Title: The Sunday Market is not closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.