अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा घरकुलासाठी संघर्ष

By Admin | Updated: November 15, 2015 02:26 IST2015-11-15T02:26:28+5:302015-11-15T02:26:28+5:30

पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे ..

Sumanbai's house collapse collapsed in a landslide | अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा घरकुलासाठी संघर्ष

अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा घरकुलासाठी संघर्ष

वरिष्ठांनी दखल घ्यावी : वृद्धपणात झिजवीत आहेत कार्यालयाचे उंबरठे
पोंभुर्णा : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे वार्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास असलेली अल्पभूधारक विधवा महिला सुमन गद्देकार हिचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या सुमनला शेजाऱ्यांनी आश्रय दिला. शासनाने दिलेल्या तुटपुंज्या मदतीने शेजाऱ्यांनी हातभार लावून छोट्याशा झोपडीची व्यवस्था करून दिली. त्या झोपडीत सुमनबाई आपले वास्तव करीत असून गेल्या दोन वर्षापासून ती घरकुलाच्या संघर्षात कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.
सन २०१२-१३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने विटा मातीचे असलेले एक लाख रुपये खर्च करून बांधलेले सुमनबाईचे संपुर्ण घर कोसळले. सुमनबाईचे पती सिताराम गद्देकार हे सात वर्षापूर्वीच वारले. पतीच्या निधनानंतर ती एकटीच घरात वास्तव्यास राहत होती. तिला अपत्य नाही. तिची परिस्थिती फारच हलाखीची असून दोन वेळ पोटाची खडगी भरणेही तिला कठीण जात आहे. मोलमजुरी करून आपले कसेबसे जीवन जगत असताना तिच्यावर निसर्गाची अवकृपा झाली आणि पावसाने सुमनचे अख्खे घर पडले. तिच्यावर बेघर होण्याची पाळी आली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या पुरुषोत्तम घुघुस्कार यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला.
या घटनेनंतर शासनाकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सुमनने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय गाठले आणि आपली आपबिती सांगितली. घर कोसळल्याने तिचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी तहसील कार्यालयाकडून मात्र तिला १ हजार ९०० रुपयांची तुटपुंजी मदत मिळाली. सुमनला अपत्य नसल्याने व अल्प शेती असल्याने वयाच्या ६७ व्या वर्षी मोलमजुरी करून तिला जीवन जगावे लागत आहे.
दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या सुमनला एक हजार ९०० रुपयांत काय होणार असा प्रश्न पडला. त्यामुळे येथील जिल्हा परिषद सदस्य संगिता घोगडे व सामाजिक कार्यकर्ते निळकंठ नैताम यांनी तत्कालीन तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेऊन सदर महिलेची आपबिती सांगितली. तेव्हा सरवदे यांनी प्रत्यक्षात सुमनबाईच्या पडक्या घराला भेट देऊन शासनाकडून १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे या महिलेला आपण घरकुल देऊ, असे आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु त्यांची मात्र पोंभुर्णा येथून बदली झाल्याने तिच्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले. शासनाकडून मिळालेल्या १५ हजार रुपयांतून शेजारच्या व्यक्तींनी छतासाठी टिनांची व काही विटांची व्यवस्था करून दिली. एका झोपडीची व्यवस्था करून देण्यात आली आणि त्या झोपडीत ती वास्तव्य करीत आहे. आज ती म्हातारी झाली असल्याने तिला फिरणेही अवघड झाले आहे. मरणोत्तर काळामध्ये तरी घरकुल मिळणार काय, असा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुमनबाईला घरकुल द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sumanbai's house collapse collapsed in a landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.