सुधीर मुनगंटीवार यांची कन्हाळगाव झरण क्षेत्राला भेट
By Admin | Updated: January 18, 2016 00:58 IST2016-01-18T00:58:29+5:302016-01-18T00:58:29+5:30
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कन्हाळगाव येथील वनास पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी शुक्रवारी भेट देऊन वनाची पाहणी केली.

सुधीर मुनगंटीवार यांची कन्हाळगाव झरण क्षेत्राला भेट
कोठारी : महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कन्हाळगाव येथील वनास पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी शुक्रवारी भेट देऊन वनाची पाहणी केली. त्यासोबतच कन्हाळगाव येथील गावकऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार अॅड. संजय धोटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाव्यवस्थापक एस. एस. डोळे, विभागीय व्यवस्थापक एम. एस. फारुखी, एस. बी. पाटील व वनविकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
मध्य चांदा वनप्रकल्पात एकूण ३१ हजार १८२ हेक्टर क्षेत्र असून हे संपूर्ण राखीव वन आहे. या विभागाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्याचा समावेश येतो. मध्य चांदा वनप्रकल्पातील कार्यक्षेत्रात एकूण दहा वाघ व २३ बिबट आहेत. ही संख्या २००१ साली दोन वाघ व चार बिबट अशी होती. वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण प्रयत्नामुळे वाघाच्या संख्येत वाढ झाली आहे. या जंगलास पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी वनविभाग महामंडळाच्या वन विश्रामगृहाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मानव वन्यजीव संघर्षाबाबत वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. (वार्ताहर)