बंद नळ योजनांचा अहवाल सादर करा
By Admin | Updated: September 29, 2015 02:27 IST2015-09-29T02:27:28+5:302015-09-29T02:27:28+5:30
ज्या नळ योजनांना वीज पुरवठा नाही, अशा नळ योजनांची यादी तयार करून वीज पुरवठा खंडीत असलेल्या नळ

बंद नळ योजनांचा अहवाल सादर करा
चंद्रपूर : ज्या नळ योजनांना वीज पुरवठा नाही, अशा नळ योजनांची यादी तयार करून वीज पुरवठा खंडीत असलेल्या नळ योजनांचा अहवाल प्रशासनाला तत्काळ सादर करा. ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या आरोग्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रन समितीच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार विजय वडेट्टीवार, सुरेश धानोरकर, संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सदस्य तुळशीराम श्रीरामे, सरिता वाभिटकर, होमदेव मेश्राम व प्रकल्प संचालक अंकुश केदार उपस्थित होते.
ग्रामीण पाणी पुरवठा व त्या अनुषंगाने असलेल्या प्रश्नासंबंधी आढावा घेण्यासाठी १२ आॅक्टोंबर रोजी विशेष बैठक घेण्यात येईल असे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील निधी वेळेत खर्ची टाकावा अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. डेंग्यू व मलेरिया या आजाराची स्थितीही त्यांनी जाणून घेतली. ग्रामीण भागातील गरीब जनतेला तातडीने आरोग्य सेवा तसेच औषोधोपचार मिळावे, तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर ब्लड स्टोरेजची व्यवस्था करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी आरोग्य विभागाला दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना, राजीच गांधी राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, मागास क्षेत्र अनुदान निधी योजना, सामाजिक आर्थिक व जातनिहाय सर्व्हेक्षण आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. बैठकीचे संचालन अरुणा गतफणे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)