उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या दबंगगिरीने दहशत
By Admin | Updated: November 1, 2014 22:50 IST2014-11-01T22:50:51+5:302014-11-01T22:50:51+5:30
या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन म्हणून कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत तानाजी फत्के हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याच्या घटना

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या दबंगगिरीने दहशत
भद्रावती : या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन म्हणून कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत तानाजी फत्के हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांच्याविषयी शहरातील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अभिजीत फत्के हे पोलीस अधिकारी भद्रावती पोलीस ठाण्यात रूजू झाल्यानंतर त्यांनी कर्तव्याच्या नावाखाली नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे याठिकाणी यापूर्वी नांदत असलेली शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेआधी उघडणाऱ्या आस्थापनापैकी याठिकाणच्या चार बार आणि रेस्टॉरेंटर कारवाई करताना त्यांनी ग्राहकांसह कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. त्याची चित्रफितही सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत बार असोसिएशनच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी फत्के यांना विचारणा केली असता, माझ्या हातून चुक झाल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु त्यांनी हा शब्द काही तासातच फिरवून पुन्हा कारवाई करताना मारहाण सुरू केली. यात फुटपाथवरील दुकानदार, पानठेला चालक, काळी-पिवळी व आॅटो चालक तसेच पार्कींग केलेल्या दुचाकी चालकांना कारवाई दरम्यान चांगलाच चोप दिला. शहरात स्वतंत्र असे पार्कींग झोन नाही. त्यामुळे बाजारात दुचाकीने खरेदीसाठी गेलेला ग्राहक आपली दुचाकी मिळेल त्या जागेवर पार्कींग करीत असतो. त्यात त्यांची चुक नसताना त्यांना फत्के यांच्या असभ्य बोलण्याचा आणि मारहाणीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या वर्तनामुळे नागरिक दहशतीत आहेत. या अधिकाऱ्याला जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी समज द्यावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)