उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
By Admin | Updated: March 26, 2017 00:31 IST2017-03-26T00:31:37+5:302017-03-26T00:31:37+5:30
उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे.

उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात
ठिय्या आंदोलनाचा इशारा : समस्या सोडविण्याची मागणी
वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. शासकीय योजनांचा लाभसुद्धा रुग्णास मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. सादर समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास रुग्णालयास कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वच्छता वैधकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती शेख छोटू भाई व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे .
वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालय सुरु झाल्यापासून रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच स्वच्छतेच्या दृष्ट्रीने रुग्णालय प्रशासनात गांभीर्य नसल्याचे दिसून येते. रुग्णालय स्वच्छ तर रुग्णाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. मात्र रुग्णालयातील खोल नाल्यांमधून शौचालयाचे घाण पाणी बाहेरील नगरपालिकेच्या नाल्यात काढण्यासाठी अजूनपर्यंत रुग्णालय प्रशासनाने कुठलीही व्यवस्था किंवा उपाययोजना केलेली दिसत नाही. मागील अनेक वर्षांपासून घाण पाणी एकाच ठिकाणी साचून राहत असल्यामुळे रुग्णालय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. खोल नाल्यांमध्ये कांक्रेटिंग करून रुग्णालयातील मुख्य नाल्यांना न पं. च्या नाल्यांपर्यंत सिमेंट पाईप टाकून घाण पाणी बाहेर काढल्यास या समस्येचे निराकरण होऊ शकते. मात्र साधेसे काम करायलाही प्रशासनाला वेळ नाही.
उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी व अधिकारी हे बाहेर गावावरून ये-जा करतात. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णालयात सेवा देण्याचे कर्त्यव्य असतांनासुद्धा आपले कर्तव्य विसरून सकाळी ९.३० ते १० वाजेपर्यंत कामावर रुजू होतात. दुपारी २ वाजेपर्यंत काम करून आपल्या मर्जीने आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे ८ तासाऐवजी ४ तसाच सेवा मिळत असल्यामुळे या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर अवलंबून असणारे हजारो ग्रामीण व शहरी नागरिकांना समाधान पूरक आरोग्यसेवा मिळत नाही. असा आरोप सभापती छोटूभाई शेख यांनी केला आहे .
यामुळे उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडलेल्या अवस्थेत आहे. सदर प्रकरणाची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावी, व रुग्णालय समितीच्या सभेत निर्णय घेऊन कारवाई करावी, असे छोटू भाई शेख यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविले आहे. सदर समस्या रुग्णालय प्रशासनाने त्वरित निकाली न काढल्यास रुग्णालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)
आरोग्य सभापती यांची रुग्णालयास भेट
आरोग्य सभापतीने रुग्णालयात भेट दिली असता, ८.३० ते ९.३० व २.०० ते ५ वाजताच्या दरम्यान काही कर्मचारी व अधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसून आली. याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, बहुतेक अधिकारी व कर्मचारी आपआपल्या गावाला निघून गेल्याचे सांगण्यात आले. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना मुख्यालयी निवासी राहणे, व ८ तास सेवा देणे हे बंधनकारक करण्याकरिता प्रशासनास भाग पाडणार असल्याचे सभापती शेख छोटूभाई यांनी सांगितले.