विद्यार्थ्यांच्या आहारात निघाले सोंडे
By Admin | Updated: May 3, 2015 01:35 IST2015-05-03T01:35:29+5:302015-05-03T01:35:29+5:30
कोरपना तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांना..

विद्यार्थ्यांच्या आहारात निघाले सोंडे
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांना आहार म्हणून चक्क सोंडे लागलेल्या हरभऱ्याची उसळ देण्यात आली. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी उसळ दिल्यानंतर उसळीची दुर्गंधी येऊ लागली. विद्यार्थ्यांनी उसळ खाताच चव बदलेली वाटल्याने विद्यार्थ्यांनी उसळ खाणे बंद केले.
दरम्यान, घडलेल्या प्रकाराची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी हा प्रकार पाहिला. एका भांड्यात ठेऊन असलेली उसळ काळ्या रंगाची, अर्धवट शिजलेली आणि त्याला अळ्या आणि सोंडे लागलेले दिसले. गावकऱ्यांनी तात्काळ शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती व गावकऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्रकाराची पाहणी केली.
यापूर्वी कोरपना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र लामगे यांनी शाळेला भेट दिली होती. त्यात शालेय पोषण आहाराची चौकशी केली असता, धान्यामध्ये मोठी तफावत आढळून आली होती. त्यामुळे मुख्याध्यापिकेला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. गावकऱ्यांनी यासंबंधी शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे १३ एप्रिल रोजी तक्रार केली. हे प्रकरण ताजेच असतानाच पुन्हा पोषण आहारात सोंडे निघाले. (वार्ताहर)