विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देश सेवा करावी
By Admin | Updated: December 20, 2015 00:45 IST2015-12-20T00:45:59+5:302015-12-20T00:45:59+5:30
शिक्षणानेच देश प्रगतिपथावर जातो, हे सत्य असून शैक्षणिकदृष्ट्या प्रगतपिढी देशाचा आधारस्तंभ असते.

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देश सेवा करावी
सुधीर मुनगंटीवार : उपकरणीकरण अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
चंद्रपूर : शिक्षणानेच देश प्रगतिपथावर जातो, हे सत्य असून शैक्षणिकदृष्ट्या प्रगतपिढी देशाचा आधारस्तंभ असते. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देश सेवेत खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एक कोटी चार लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील उपकरणीकरण अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच कॅम्पस वाईड नेटवर्कींग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एन.कल्याणकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव डॉ. किरण पाटील, तंत्र शिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक जी. आर. ठाकरे, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, समीर केने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा मंचावर उपस्थित होते.
या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फक्त प्रमाणपत्रासाठी शिक्षण घेऊ नये तर आपण घेतलेल्या शिक्षणाचा इतरांना व देश सेवेसाठी उपयोग करावा, असे ते म्हणाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयातर्फे सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याकरीता निधीची आवश्यकता असल्यास सांगावे, आपन निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उच्चविद्याविभूषित व तंत्रज्ञान अवगत असलेल्या मनुष्यबळाची जगात सर्वत्र मागणी असून चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रगत तंत्रज्ञान अवगत करुन कुशल मनुष्यबळ मागणीची पूर्तता करण्यात अग्रेसर रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या देशात कौशल्य विकासावर अधिक भर देण्याचे धोरण अवलंबिले असून या धोरणामुळे कौशल्य निपून तरुण-तरुणींना भविष्यात मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आर. टी. पेचे यांनी तर आभार प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व महाविद्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)