विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करा
By Admin | Updated: February 7, 2016 01:59 IST2016-02-07T01:59:55+5:302016-02-07T01:59:55+5:30
नवराष्ट्र निर्मितीसाठी शाळेतील विद्यार्जनाबरोबरच राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेच्या विचाराची गरज आहे, असे मत घुग्घुस ...

विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करा
गाडेकर महाराज : घुग्घुसमध्ये तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा
घुग्घुस : नवराष्ट्र निर्मितीसाठी शाळेतील विद्यार्जनाबरोबरच राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेच्या विचाराची गरज आहे, असे मत घुग्घुस येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संताच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्धवराव गाडेकर महाराज यांनी व्यक्त केले.
या सत्राचे उद्घाटन गुरूकुंज येथील दास टेकडीचे अध्यक्ष डॉ. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव खवसे महाराज, बंडोपंत बोढेकर, हळदे महाराज, जि.प. चे शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक एम.जी. पिंपळकर, प्रियदर्शनी कन्या विद्यालय तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे, जनता विद्यालय तथा महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम धोपटे, उपप्राचार्य डॉ. हेलवटे, उपसरपंच संतोष नुने व ग्राम गीताचार्य गणेश शिरपूरकर यांची मंचावर उपस्थिती होती.
शाळेतील शिक्षणातून ज्ञान मिळते. पण जीवनात आदर्श जीवन कसे जगावे, यासाठी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतून आत्मसात करण्याची गरज आहे, असे गाडेकर महाराज यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी ग्रामगीताचार्य गणेश शिरपूरकर यांचा सत्कार करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ८ ते १० व ११ ते पदवीधर अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अ गटातून हर्षाली जेवूरकर हिने प्रथम पारितोषिक, प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या द्वितीय व तृतीय अनुक्रमे सपना येरगुडे, पायल बंडू धांडे हिने पटकविला. ब गटात मोरवा विद्यालयाच्या कोयल नवले हिने प्रथम, चिंतामणी कॉलेजचा राकेश जुनघरे द्वितीय तर आंबेडकर कॉलेजच्या मेघा बावणे हिने तृतीय पारितोषिक पटकाविले.
तत्पूर्वी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. त्यात जिनेश्वर रामदास दिघोरे जनता विद्यालय, द्वितीय रंजना मलेश सरस्वती विद्यामंदिर म्हातारदेवी तर तृतीय बक्षीस कोमल कालिदास नवले या प्रियदर्शनी विद्यालयाच्या विद्यार्थिनीने पटकविला.
या विद्यार्थ्यांना उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र घोटकर, प्रास्ताविक रमाकांत माधारे तर आभार रमेश बोबडे यांनी मानले. कार्यक्रमात या परिसरातील विद्यालय, महाविद्यालय व मोठ्या संख्येने शिक्षक व नागरिक उपस्थित होते. दुपारी २ वाजता सर्वधर्म परिषद व व्याख्यानमाला आयोजित आहे. (वार्ताहर)