सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप
By Admin | Updated: December 16, 2015 01:21 IST2015-12-16T01:21:41+5:302015-12-16T01:21:41+5:30
मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते.

सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप
आदेशाची पायमल्ली : ११ दिवसांपासून विद्यार्थी अध्ययनापासून वंचित
खडसंगी : मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.व्ही. डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याध्यापकांना इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याचे तोंडी आदेश देत व्हिजीट बुकवर नोंद केली. मात्र मुख्याध्यापक डी.डी. पवार यांनी संबंधित शिक्षकांना रूजू न करता शाळेतून पोबारा केला. त्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तिव्र केले आहे.
चिमूर येथील क्रीडा शिक्षक विकास मंडळाद्वारे सावरगाव येथे १९८७ पासून सर्वांग विकास विद्यालय चालविले जात आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा, गावातील विद्यार्थी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षणाचे धडे घेतात मात्र संस्था चालकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेवर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही तर तासिका तत्वावर शिक्षकांच्या अनधिकृत नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.
मागील तीन महिन्यांपासून इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी ४ डिसेंबरला शाळेवर बहिष्कार टाकत शाळेत जाणे बंद केले. या आंदोलनाने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी दखल घेत शाळेत येवून पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित इंग्रजी व गणित विषयाच्या शिक्षकांना रूजू करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अलोणे नामक शिक्षिका व चौधरी नामक शिक्षक रूजू होण्यासाठी आले असता, मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना रूजू करण्यास नकार दिला व दुपारी शाळेतून पोबारा केला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी संतप्त होवून शाळेला कुलूप ठोकले. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला बगल देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त पालकांनी मंगळवारी चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयत धडक दिली. संस्था चालकांच्या वादात आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही व आमच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत आम्ही शाळेचे कुलूप काढणार नसल्याचा पवित्र पालक व विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
शिक्षकांचा बैठा सत्याग्रह
नियमितपणे शिक्षक शाळेवर आले. मात्र शाळेला पालक व विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक कार्य करता न आल्याने दरी टाकून शाळेच्या पटांगणात आपले कर्तव्य पार पाडावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठीही शिक्षकांना गावात जावे लागत होते. शालेय दस्याऐवज नसल्याने नवीन रजिस्टर आणून आपली उपस्थिती दाखवित इतर कामे करावी लागली.