शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत
By Admin | Updated: March 22, 2016 01:06 IST2016-03-22T01:06:06+5:302016-03-22T01:06:06+5:30
तालुक्यातील कुनाडा या गावाचे तिसऱ्यांदा पुनर्वसन झाले असले तरी गावकऱ्यांच्या समस्या मात्र सुटलेल्या नाही. वेकोलिकडून

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव मुठीत
विनायक येसेकर ल्ल भद्रावती
तालुक्यातील कुनाडा या गावाचे तिसऱ्यांदा पुनर्वसन झाले असले तरी गावकऱ्यांच्या समस्या मात्र सुटलेल्या नाही. वेकोलिकडून या क्षेत्रात दिवसेंदिवस ब्लास्टिंगचे प्रमाण वाढत असून काही घरासह जिल्हा परिषद शाळेला भेगा पडून ही इमारत पडण्याच्या स्थितीत आहे. शाळेच्या इमारतीची अशी स्थिती असताना सुद्धा वेकोलि व जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत.
वेकोलिच्या माजरी एरियामध्ये चारगाव, तेलवासा, कुनाडा, ढोरवासा या खाणी आहे. या भागात यापूर्वी सुद्धा वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टींगमुळे घरांची पडझड, जिवीत हाणी आदी नुकसान झाले आहे. चारगाव या गावाचे पूर्वी दोन वेळा पुनर्वसन झाल्यानंतर २००४ मध्ये भद्रावती लगत १ कि.मी. अंतरावर पुन्हा पुनर्वसन झाले. कुनाडा गावातील गावकऱ्यांच्या संघर्षानंतर वेकोलिने गावात थातूर-मातूर उपाययोजना करून दिल्या. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र ब्लास्टिंगमुळे पुनर्वसन होताच काही महिन्यातच या शाळेला भेगा गेल्याने वेकोलिने डागडुगी करून शाळा जिल्हा परिषदकडे सोपविली. या पुनर्वसीत शाळेला ब्लास्टिंगमुळे भेगा गेल्याने संपूर्ण इमारत पडण्याच्या अवस्थेत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटूंबातील असल्याने ते जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत आहे. या शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग असून येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
येथील मुख्याध्यापिका अर्चना येरणे यांनी शाळेत कोणताही अपघात घडू नये, यासाठी वेकोलिच्या कुसना येथील मुख्य महाप्रबंधक, चारगाव येथील क्षेत्रीय प्रबंधक यांना लेखी निवेदन देऊन शाळेचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे असेच दुर्लक्ष होत राहिले तर एखाद्या वेळेस ब्लास्टिंगने इमारत कोसळून मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र सध्याच्या स्थितीवरून निश्चीत दिसून येत आहे.
पुनर्वसित कुनाडा गावातील शाळेची अवस्था बघता आपण स्वत: वेकोलि प्रशासनाला लेखी निवेदन दिले. याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांनासुद्धा कळविले आहे. मात्र वेकोलि प्रशासनाने एकदाही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना पाठवून साधी शाळेची पाहणीसुद्धा केलेली नाही.
- अर्चना येरणे, मुख्याध्यापिका, जि.प. शाळा, कुनाडा.
चारगाव येथे वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे घर कोसळून आठव्या वर्गात शिकणारी धानकी परिवारातील मुलगी मृत पावली होती. याची दखल घेऊन आम्ही वेकोलि मुख्य महाप्रबंधकाला वारंवार निवेदन देऊन पुनर्वसित शाळेची सुधारणा सी.एम.आर. फंडातून करण्यासाठी पत्र दिले. मात्र वेकोलि दुर्लक्ष करीत असून या विरोधात आंदोलन केले जाईल.
- विजय वानखेडे, जि. प. सदस्य.